दहावीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट उद्ध्वस्त; सांगली, संभाजीनगरमधून आरोपींना बेड्या | पुढारी

दहावीचे बनावट प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट उद्ध्वस्त; सांगली, संभाजीनगरमधून आरोपींना बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पाचवी नापास असतानाही त्याचे दहावीच्या परीक्षा उत्तीर्णचे बनावट प्रमाण तयार केल्याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या पथकाने चौघांना बेड्या ठोकल्या. आतापर्यंत तपासात 35 जणांना अशी बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संदीप ज्ञानदेव कांबळे ( रा. दुधारी, जि. सांगली), कृष्णा सोनाजी गिरी (रा. बिडकीन, संभाजीनगर), अल्ताफ शेख (रा. परांडा, धाराशीव) व सय्यद इम्रान सय्यद इब्राहिम (रा. संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात राहुल होळकर यांनी फिर्याद दिली. ही घटना 8 फेब्रुवारी ते 30 एप्रिलदरम्यान घडली.
गुन्हे शाखेला सांगली येथील संदीप कांबळे हा दहावी नापास व्यक्तींना बनावट प्रमाणपत्र देत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एकाला पाचवी नापास असल्याचे सांगून कांबळे याच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्या वेळी कांबळे याने प्रमाणपत्रास 60 हजार रुपये लागतील, असे सांगितले. त्यानुसार बनावट ग्राहक यांनी प्रथम 9 फेब्रुवारी रोजी 39 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले.

त्यानंतर 15 दिवसांत प्रमाणपत्र मिळेल, असे सांगितले. परंतु, दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत, प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होईल, असे सांगण्यात आले. 10 एप्रिल रोजी कांबळे याने खासगी कामानिमित्त स्वारगेटला येणार आहे, त्या वेळी उर्वरित रक्कम तयार ठेवा,असे सांगितले. बनावट ग्राहक यांनी रोख स्वरूपात 16 हजार आरोपीला दिले. त्या वेळी आरोपीने 25 एप्रिलला 10 वी पासचे प्रमाणपत्र सॉफ्ट कॉपीमध्ये पाठवले.

दरम्यान, 30 एप्रिलला तो कांबळे स्वारगेट येथे येणार असल्याने उर्वरित 5 हजार रुपये घेऊन बनावट दहावीचे प्रमाणपत्र दिल्यानंतर कांबळे याला ताब्यात घेतले. त्यानंतर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक शंकर पाटील, अंमलदार गजानन सोनवलकर, राहुल होळकर, भाऊसाहेब साडेमिसे, मुलानी यांच्या पथकाने अटक केली. आतापर्यंत त्यांनी 35 जणांना दहावीचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा सय्यद इम्रान असून, त्याने महाराष्ट्र राज्य ओपन स्कूल नावाने मान्यता मिळवली होती. याच पार्श्वभूमीवर त्याने दहावीचे प्रमाणपत्र दिले. स्वत:च्या सह्या करून दिले आहे, त्यासाठी त्याने कोणतीही परीक्षा घेतली नसल्याचे तपासात समोर आले आहे. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Back to top button