बारसूला विरोध करणार्‍यांना विश्वासात घ्या : अजित पवार | पुढारी

बारसूला विरोध करणार्‍यांना विश्वासात घ्या : अजित पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बारसू प्रकल्पाला विरोध करणार्‍यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. बारसू प्रकल्पातून पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही, तिथल्या लोकांचा कुठल्या गोष्टीला विरोध आहे हे विचारायला हवे. तेथील लोकांचा व्यवसाय अडचणीत येऊ शकतो, म्हणून हा विरोध आहे का आणखी इतर कारणे आहेत हे बघायला हवे.

राष्ट्रवादीची भूमिका विकासाबाबत नेहमी सकारात्मक राहिली आहे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले. पवार म्हणाले, बारसू परिसरातील लोकांचे कायमचे नुकसान होणार असेल, तर विरोध नक्की करा. पण त्यातून फायदा होणार असेल तर त्याचा विचार करायला हवा.

नाणारबद्दलही प्रश्न उपस्थित झाला होता, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी विषय घेतला होता. अनेक प्रकल्प राज्यातून बाहेर गेलेले आपण पाहिले. पण यातून निसर्गाला बाधा न पोहोचता तिथे रोजगार येणार आहे का, याची शहानिशा करायला हवी. स्वतः उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. मी बारसूला जायचे ठरवले नाही. पण वेळ पडली तर जाईन. या प्रश्नी सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी. जनसुनावणी घ्यावीच लागेल.

खेळात पारदर्शकता हवी

पी. टी. उषा यांचे वक्तव्य मी ऐकले आहे. कुस्ती असो किंवा इतर खेळ यात पारदर्शकता हवी. आरोप आहेत त्यांची चौकशी करायला हवी, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Back to top button