विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेचा मार्गदर्शक हरवला..! राज्य शासनाला कलचाचणीचा विसर | पुढारी

विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेचा मार्गदर्शक हरवला..! राज्य शासनाला कलचाचणीचा विसर

गणेश खळदकर : 

पुणे : करिअरची दिशा ठरविण्यासाठी दहावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची परीक्षेपूर्वी कलचाचणी घेतली जात होती. यातून नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन केले जात होते; परंतु कोरोनामुळे मार्च 2020 मध्ये ही चाचणी रद्द झाली. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत एकदाही या चाचणीचे आयोजन करण्यात आले नाही, त्यामुळे राज्य शासनाला कलचाचणीचा विसर पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात खासगी संस्था तसेच काही शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येते. त्याच धर्तीवर शालेय शिक्षण विभागाने 2016 पासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कलचाचणीचा उपक्रम सुरू केला होता. कलचाचणीचा अभ्यासक्रम विद्या प्राधिकरण ठरवायचे तर कलचाचणीची अंमलबजावणी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात येत होती.
शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कलचाचणी ‘श्यामची आई फाउंडेशन’मार्फत घेण्यात येत होती. परंतु ही चाचणी घेण्यासाठी शिक्षण विभाग आणि फाउंडेशन यांच्यात झालेला करार संपला. यासंदर्भात राज्य मंडळ तसेच विद्या प्राधिकरणातील अधिकार्‍यांशी संपर्क केला, मात्र त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

कलचाचणीचा नेमका फायदा काय…
कलचाचणीमध्ये विद्यार्थ्यांची अभाषिक बुद्धिमत्ता चाचणी, जनरल अ‍ॅप्टिट्युड टेस्ट, रसशोधन (इंटरेस्ट), समायोजन (अ‍ॅडजस्टमेंट) यावर आधारित परीक्षा घेण्यात येते. या चारही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येतात. प्रश्नपत्रिकेतील उत्तरांमुळे विद्यार्थ्यांचा खरा कल, त्यांची आवड आणि सवयी लक्षात येतात. मानसशास्त्रीय चाचणी आणि समुपदेशनाने विद्यार्थ्यांना पुढील व्यवसाय व विद्याशाखा निवडण्यास अतिशय मोलाची मदत होते.

आमच्या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी दहावी-बारावीच्या पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांची कलचाचणी घेण्यात येते. विद्यार्थ्यांची चाचणी घेतल्यानंतर त्यांचे जे रिपोर्ट येतात यावरून विद्यार्थ्यांची इच्छा काय आहे त्यापेक्षा त्यांची क्षमता तपासून सकारात्मक मार्गदर्शन केले जाते. – नीलिमा आपटे,
विभाग प्रमुख,
                                           अभिक्षमता मापन विभाग, ज्ञानप्रबोधिनी संस्था

 

Back to top button