बारामती, पुढारी वृत्तसेवा: एवढ्या मोठ्या महाराष्ट्रात रोज कोणी काही ना काही बोलणार, त्यावर तुम्ही मला प्रतिक्रिया विचारणार, हे होणार नाही. असल्या कुठल्याही गोष्टींना उत्तरे द्यायला मी बांधिल नाही, या शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुन्हा माध्यमांना सुनावले.
बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवसांच्या रजेवर जाणार असल्याच्या प्रश्नावर पवार भडकले, त्यांच्या रजेबाबत मला माहिती नाही. तुमचे ते नाॅट रिचेबल माझ्यापुरते बास झाले. बाकीचे कुठे आहेत मला काय विचारता, उद्या तुमचे वरिष्ठ संपादक कुठे गेले तर तुम्हाला सांगून ते जाणार आहेत का? तुम्हाला मुख्यमंत्र्यांबाबत विचारायचे असेल तर मुख्यमंत्री कार्यालयाला विचारा, मला का विचारता? असे पवार म्हणाले.
संजय शिरसाट यांनी केलेल्या कौतुकाबाबत विचारणा केली असता, पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी तुम्हाला का वाईट वाटतंय? तुमच्या पोटात का दुखतंय? असा प्रति प्रश्न केला. मला तुमच्या या असल्या प्रश्नाला उत्तरेच द्यायची नाहीत. तुम्हाला २४ तास दाखवायला बातम्या नसतात. म्हणून काहीही विचारणे योग्य नव्हे. जे विधायक प्रश्न आहेत ते विचारणे योग्य आहे. राज्याच्या हिताचे प्रश्न विचारणे योग्य आहे.
हल्ली पत्रकरांशी बोलताना अजित पवार यांचा पारा वारंवार चढत असल्याचे लक्षात येत आहे. पत्रकारांनी प्रश्न विचारला की, पवार एकतर खिल्ली उडवतात किंवा पत्रकारांचे प्रबोधन सुरू करतात.