राजकारणात काहींची नशा करून कुस्ती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका | पुढारी

राजकारणात काहींची नशा करून कुस्ती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका

नगर; पुढारी वृत्तसेवा : अलीकडच्या काळात राजकारणातही कुस्त्या चालल्या आहेत. कुस्तीत डोपिंग करणार्‍या पैलवानाला कुस्तीतून बाद व्हावं लागतं. तसं आमच्या राजकारणातही काही लोक सकाळी नऊ वाजता नशा करून कुस्ती खेळायला लागले आहेत. पण, नशा करून कुस्ती खेळणार्‍यांना बाद व्हावं लागतं, असा चिमटा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता काढला.

अहमदनगर भाजप, शिवसेना व जिल्हा तालीम संघाने आयोजित केलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, भाजपचे शहर अध्यक्ष महेंद्र गंधे, दिलीप सातपुते, सुवेंद्र गांधी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कुस्ती असा खेळ आहे की, ज्या खेळाने पहिल्यांदा ऑलिंपिकमध्ये आपल्याला पदक मिळवून दिले. त्यानंतर आपल्याला ऑलिंपिकचे पदक मिळाले नाही. ते महाराष्ट्राच्या मातीतून मिळाले पाहिजे. आपले सरकार आल्यानंतर पैलवानाच्या मानधनामध्ये तीन हजारांवरून 18 हजार रुपयांपर्यंत वाढ केली. मी मुख्यमंत्री असताना तीन वेळा महाराष्ट्र केसरीचा मान मिळविणार्‍याला पोलिस दलात डीवायएसपीची नोकरी देण्याचा निर्णय घेतला. आता वेगवेगळ्या स्थरावर पैलवानांना नोकरी देण्याचे काम करीत आहोत. मातीचा खेळ आता मॅटचा झाला. पण खेळ मातीचा असो की मॅटचा अंगाला माती लावल्याशिवाय विजय संपादन करता येत नाही.

आशीर्वाद राहू द्या, 2024 ला जिंकू!
फडणवीस म्हणाले, असली मातीचे पहिलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात. तुमच्या आशीर्वादाने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुस्ती जिंकली आहे. 2024 ला पुन्हा जिंकू. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या.

Back to top button