

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंगाची काहिली करणार्या उन्हाच्या तीव्र झळांपासून आगामी चार दिवस आपली सुटका होणार आहे. कारण पाकिस्तानातून पश्चिमी चक्रवात सक्रिय होत काश्मिरात पोहोचल्याने तेथे बर्फवृष्टी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात 20 ते 24 एप्रिलपर्यंत वादळी वार्यासह पाऊस पडेल, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. होसाळीकर यांनी सांगितले की, उद्या दि.20 ते 24 एप्रिल असे चार दिवस राज्याच्या तापमानात मोठा बदल होत आहे.
उत्तरेत पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने अचानक हा बदल होत आहे. काश्मिरात बर्फवृष्टी सुरू आहे. राजस्थानसह आजूबाजूच्या राज्यांतही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होऊन उन्हाचा चटका तीन ते चार दिवस कमी होणार आहे. राज्यात वादळी वार्यासह हलका पाऊस होईल. त्यामुळे कमाल तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होईल.
विदर्भात हाहाकार…
बुधवारी विदर्भात उष्णतेच्या लाटेने हाहाकार निर्माण केला आहे. बुधवारी विदर्भाचे सरासरी तापमान 42.5 अंशांवर होते. राज्यात ब्रह्मपुरी शहराचे तापमान हंगामातील सर्वाधिक 43.8 इतके नोंदवले गेले.
बुधवारचे राज्यातील प्रमुख शहरांचे तापमान
ब्रह्मपुरी 43.8, गोंदिया 43.5, अकोला 42.8, अमरावती 42.2, चंद्रपूर 42.8, नागपूर 42, वर्धा 42.5, पुणे 40, लोहगाव 40, नगर 39, जळगाव 41.9, कोल्हापूर 39.5, महाबळेश्वर 33.2, नाशिक 38.8, सांगली 39.9, सोलापूर 42.2, धाराशिव 40.3, छत्रपती संभाजीनगर 40.6, नांदेड 41.5, बीड 41.5, मुंबई 34.6, सांताक्रुझ 38.8, रत्नागिरी 34.7