पुणे/ येरवडा : पुढारी वृत्तसेवा : कारागृहांतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी राज्यातील बारा कारागृहांवर आता ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. त्यामध्ये मध्यवर्ती येरवडा, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, तळोजा, ठाणे, अमरावती, नागपूर आणि जिल्हा कारागृह कल्याण, चंद्रपूर या ठिकाणी ड्रोनद्वारे हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे, अशी माहिती अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कारागृह सुरक्षा बळकटीकरणासाठी ड्रोनद्वारे नजर ठेवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानुसार 12 ड्रोन विविध कारागृहांतील बारीकसारीक गोष्टी व हालचाली टिपणार आहेत. संबंधित ड्रोनद्वारे रात्रीच्या वेळीही चित्रीकरण करण्यात येणार आहे. विशेषतः कारागृहात होणार्या घटना आणि कैद्यांची अपडेट मिळण्यास मदत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, तळोजा, ठाणे, अमरावती, नागपूर, कल्याण आणि चंद्रपूर या ठिकाणी ड्रोन पाहणी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारनेही तातडीने ड्रोन टेहळणीसाठी प्राधान्य दिले आहे.
राज्य सरकारकडून निधीची तरतूद
कैद्यांची सुरक्षा अबाधित ठेवणे, कारागृह परिसरात सक्षम सुरक्षाव्यवस्था निर्माण करण्यासाठी ड्रोनद्वारे फुटेज एकत्रित केले जाणार आहे. त्याशिवाय राज्यातील कारागृहांच्या मुख्य प्रवेशद्वारांजवळ कर्मचार्यांसह इतरांची झडती घेणे आवश्यक असल्याने स्वयंचलित ड्रोन मदतीला येणार आहे. राज्य सरकारकडून ड्रोनसाठी 1 कोटी 80 लाख आणि एक्स रे बॅगेज स्कॅनरसाठी 1 कोटी 94 लाख असे मिळून तब्बल 3 कोटी 74 लाखांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती या वेळी गुप्ता यांनी दिली.
दोन हजार पदांची लवकरच भरती
राज्य कारागृह विभागात अनेक वर्षे भरतीप्रक्रिया प्रलंबित होती. सध्या राज्य कारागृह विभागात पाच हजार कर्मचारी कार्यरत असून, नव्याने दोन हजार पदांची लवकरच भरती केली जाणार आहे. कारागृह कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी यांची संख्या नवीन भरतीप्रक्रियेमध्ये अधिक ठेवण्यात आली आहे. मागील वर्षी 120 कैद्यांचे खराब प्रकृतीमुळे कारागृहात मृत्यू झाले होते. यंदा ते प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती राज्य कारागृह विभागाचे अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी दिली आहे.
गुप्ता म्हणाले की, पालघर आणि अहमदनगर येथे नवीन कारागृहे बनविण्यात येणार आहेत. तसेच आणखी दोन नवीन कारागृह विभाग बनवण्याचा प्रस्ताव सरकारकडे देण्यात आला आहे. उद्योजक सायरस पूनावाला यांनी येरवडा आणि कोल्हापूर येथील कारागृहांतील दहा हजार कैद्यांना रोज गरम पाणी देण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. राज्यातील कारागृह विभागाकडे 1 हजार 200 संगणकांची मागणी आली असून, ती लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.