राज्यातील पहिली अंतराळ प्रयोगशाळा तयार; पुण्यातील मुळशीत शुक्रवारी उद्घाटन | पुढारी

राज्यातील पहिली अंतराळ प्रयोगशाळा तयार; पुण्यातील मुळशीत शुक्रवारी उद्घाटन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लहान मुलांना अंतराळातील विज्ञानाबाबत, भारताच्या अंतराळ मोहिमांबाबत कुतूहल निर्माण व्हावे, या क्षेत्रात त्यांना गोडी निर्माण व्हावी, यासाठी मुळशी तालुक्यातील हेरीटेज इंटरनॅशनल स्कूल या शाळेने अंतराळ प्रयोगशाळा उभारली आहे, अशी माहिती शाळेचे संचालक कुणाल भिलारे, डॉ. प्रतीक मुणगेकर, शाळेच्या प्रशासकीय व्यवस्थापिका यशस्विनी भिलारे व प्राचार्या रेणू पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (इस्रो) या संस्थेच्या स्पेस ट्युटर प्रोग्रामअंतर्गत व्योमिका स्पेस अकॅडमीचे संस्थापक गोविंद यादव आणि सल्लागार समितीचे सदस्य डॉ. प्रतीक मुणगेकर यांच्या पुढाकाराने अंतराळ शिक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात आली असून, इस्रोच्या आतापर्यंतच्या अंतराळ मोहिमा, इस्रोकडून तयार करण्यात आलेले यान, उपग्रह प्रक्षेपक याची सविस्तर माहिती खर्‍याखुर्‍या मोड्युल्सद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

या प्रयोगशाळेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी 5 वाजता कासार आंबोली (ता. मुळशी) येथील हेरिटेज इंटरनॅशन स्कूल येथे होणार आहे. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व इस्रोचे अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. टी. एन. सुरेशकुमार यांच्या हस्ते प्रयोगशाळेचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, गोविंद यादव आणि डॉ. प्रतीक मुणगेकर उपस्थित राहणार आहेत. या प्रयोगशाळेत एसएलव्ही 3 एएसएलव्ही, पीएसएलव्ही जीएसएलव्ही डी ए जीएसएलव्ही एमकेर, एसएसएलव्ही या प्रक्षेपकांसोबत चांद्रयान 1 मंगलयान 1 या यानांच्या खर्‍याखुर्‍या प्रतिकृती पाहायला आणि त्यांचा अभ्यास करायला मिळणार आहे.

Back to top button