

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या महसूल आणि वन विभागात पदोन्नती तसेच सरळसेवेने भरण्याची तब्बल 13 हजार 354 पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे. त्यामुळे ही पदभरती तातडीने करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षार्थींनी केली आहे.
राज्य शासनाकडून 75 हजार पदांची शासकीय भरती करण्याची केवळ घोषणा करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र पदभरती थंड बस्त्यात असल्याचे चित्र आहे. सरळसेवा भरती रखडत असल्यामुळे उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे.
राज्य सरकारने सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत म्हणून उमेदवार आक्रमक झाले आहेत. महसूल व वन विभागामध्ये वर्ग अ आणि ब बरोबरच क संवर्गातील सर्वाधिक पदे रिक्त आहेत. यामध्ये तब्बल पाच हजारांहून अधिक पदे ही तलाठ्यांची आहेत. मात्र, शासन त्यांच्या भरतीसाठी कोणतीच हालचाल करताना दिसत नाही.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केलेल्या घोषणेला निदान शासनाने जागावे. रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील यंत्रणांना अधिक ताण सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर नागरिकांनाही विविध सेवांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे स्पर्धा परीक्षार्थींचे म्हणणे आहे. दरम्यान, माहिती अधिकाराला उत्तर देताना महसूल विभागाने तलाठी संवर्गाची भरती टीसीएसमार्फत करण्यासाठी प्रक्रिया चालू असल्याचे स्पष्ट केले आहे.
महसूल विभागातील पदांचे विवरण…
संवर्ग – सरळसेवा आणि पदोन्नतीची रिक्त पदे
अप्पर जिल्हाधिकारी ः 31
उपजिल्हाधिकारी ः 16
तहसीलदार ः 66
अराजपत्रित लघुलेखक ः 153
मंडळ अधिकारी ः 2575
शिपाई – 917
नायब तहसीलदार ः 457
तलाठी ः 5030
अधीक्षक ः 12
उपअधीक्षक ः 91
पदसमूह चार ः 1819
शिपाई ः 1167
मुद्रांक निरीक्षक ः 15
दुय्यम निबंधक श्रेणी एक ः 182
कनिष्ठ लिपिक ः 532
शिपाई ः 291
एकूण – 13354