अजित पवार यांचे‌ आज दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द ; राजकीय‌ वर्तुळात चर्चांना उधाण | पुढारी

अजित पवार यांचे‌ आज दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द ; राजकीय‌ वर्तुळात चर्चांना उधाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत मागील काही दिवसांपासून विविध राजकीय चर्चा रंगत आहेत. असे असतानाच अजित पवार यांनी सोमवारी दिवसभरात आयोजित केलेले सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

राज्यातील सत्ता संघर्षावर न्यायालयाकडून काही दिवसातच निर्णय दिला जाणार आहे. न्यायालयाने जर मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांना अपात्र ठरवले तर भाजप अजित पवार यांना सोबत घेवून सरकार चालवेल. याबाबत भाजप नेते व अजित पवार यांच्या काही गुप्त बैठकाही झाल्याची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे. मागील आठवड्यातही अजित पवार पुण्यातील आपले कार्यक्रम रद्द करून नॉटरिचेबल झाले होते. त्यानंतर तर ते आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेवून भाजपसोबत जाणार या चर्चेला चांगलेच बळ मिळाले होते.

त्यानंतर अजित पवार यांनी आपण तब्येत बरी नव्हती म्हणून विश्रांतीसाठी घरीच होतो, असे स्पष्टीकरण दिले. मात्र त्यानंतरही त्यांच्याबाबतच्या चर्चा थांबण्याचे नाव घेत नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले असता, अजित पवार यांनी त्यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा कालपासून राज्यात रंगली. याबाबतच्या वृत्ताचा अजित पवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात इन्कार केला. त्यानंतर त्यांचे सोमवारी दिवसभर पुणे जिल्ह्यात आयोजित केलेले सर्व कार्यक्रम अचानकपणे रद्द केले. त्यातच भाजपचे दोन मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

 म्हणून अजित पवार पुणे दौऱ्यात अनुपस्थित 

या दरम्यान अजित पवार यांनी सगळ्या प्रकरणावर खुलासा केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, काल रात्री उशिरा त्यांनी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात श्री सेवकांची भेट घेतली. तेथून येण्यात त्यांना पहाटे तीन वाजले. त्यामुळे पुण्याला परत येण्याऐवजी ते मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी थांबले होते. अजित पवारांच्या अनुपस्थितीत शरद पवार आणि सुप्रिया सुळे पुण्यातील बहुतांश कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

Back to top button