राज्य पथकातर्फे आयव्हीएफ, सरोगसी सेंटरची होणार पाहणी | पुढारी

राज्य पथकातर्फे आयव्हीएफ, सरोगसी सेंटरची होणार पाहणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील आयव्हीएफ आणि आययूआय सेंटर, सरोगसी सेंटर, तसेच स्पर्म बँकच्या नोंदणी नूतनीकरणाची प्रक्रिया जुलैमध्ये पार पडली. त्यानुसार नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आता राज्याचे पथक सेंटर्सची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याने प्रमाणपत्रे परत घेण्यात आली आहेत. असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्निक या कायद्यांतर्गत सर्व केंद्रांची नव्याने नोंदणी करून घेण्यात आली. कायद्यांतर्गत चार परवान्यांचा समावेश आहे. या चारही प्रकारांमध्ये परवानगीसाठी ऑनलाइन पोर्टलवर अर्ज भरून घेण्यात आला. प्रमाणपत्र प्रत्येक सेंटर्समध्ये लावून ठेवण्यास सांगण्यात आले. राज्य सरकारकडून पाहणीबाबतचा लिखित आदेश आले नसला, तरी त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

प्रमाणपत्रांचे वितरण चार प्रकारांमध्ये केले जाणार आहे. स्पर्म बँक, एआरटी वन, एआरटी टू आणि सरोगसी सेंटर अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामधील तिसर्‍या आणि चौथ्या प्रकारासाठी नर्सिंग होमची आवश्यकता आहे. त्यामुळे त्याचा परवाना शुल्क प्रत्येकी दोन लाख रुपये, तर स्पर्म बँक आणि एआरटी वन यासाठी प्रत्येकी 50 हजार रुपये नोंदणी शुल्क असणार आहे. सरोगसीसाठी तीन वर्षे, तर अन्यसाठी पाच वर्षांसाठी ही परवानगी असेल.

नवीन वर्षात श्रेणी 1 चे 4 एआरटी सेंटर, तर दुसर्‍या श्रेणीतील 2 सेंटरची नव्याने नोंदणी करण्यात आली आहे. एखाद्या सेंटरविरोधात तक्रार प्राप्त झाल्यास सेंटरची प्रत्यक्ष पाहणी करून त्याबाबतचा अहवाल राज्य कुटुंब कल्याण कार्यालयास सादर केला जातो.
          – डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

शहरातील केंद्रांची संख्या

केंद्राचा प्रकार 2022 2023
एआरटी सेंटर (श्रेणी 1) 40 4
एआरटी सेंटर (श्रेणी 2) 46 2
स्पर्म बँक 7 0
सरोगसी सेंटर 21 0

नोंदणी करण्याची प्रक्रिया

एआरटी (असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी) सरोगसीच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरणे
राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडून चलन घेऊन, ते भरून महापालिकेमधील समुचित प्राधिकार्‍यांचा सही-शिक्का घेऊन राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडे भरणे पैसे भरून झाल्यावर चलनाच्या झेरॉक्स प्रतीवर क्लिनिकच्या सही-शिक्कासहित झेरॉक्स प्रत आणि कागदपत्रे महापालिकेत जमा करणे

Back to top button