पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या परिषदेला धक्का बसला असून, त्यांच्या संघटनेची संलग्नता भारतीय कुस्तीगीर महासंघाने रद्द केली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे अध्यक्षपद भूषविलेल्या शरद पवार यांना हा मोठा धक्का असल्याचे कुस्तीक्षेत्रात बोलले जात आहे.
भारतीय कुस्तीगीर महासंघाची उत्तर प्रदेश मधील लखनौ येथे सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेपूर्वी महासंघाच्या कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीमध्ये शरद पवारांच्या कुस्तीगीर परिषदेला पाठविलेल्या नोटिशीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा यावर चर्चा करून शरद पवार यांच्या कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर खासदार रामदास तडस यांच्या परिषदेला संलग्नता मान्यता देण्यात आली असून, यापुढे त्यांचीच परिषद कुस्तीचे कार्य पाहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भारतीय कुस्तीगीर महासंघाची मान्यता केंद्र सरकारने रद्द केलेली आहे, त्यामुळे त्यांना सर्वसाधारण सभा घेऊन संलग्नता रद्द करण्याचा अधिकार नाही. अद्याप त्यांचे तसे पत्र आलेले नाही. त्यांचे पत्र आले की आपण बोलू. तुम्ही त्याची चिंता करू नका. – बाळासाहेब लांडगे, महासचिव, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद
कुस्तीगीर महासंघाच्या सर्वसाधारण सभेला बाळासाहेब लांडगे यांना परवानगी दिलेली नाही. या सभेमध्ये बाळासाहेब लांडगे यांच्या कुस्तीगीर परिषदेची संलग्नता रद्द करण्यात आली असून, खासदार रामदास तडस यांच्याच संघटनेला सभेत अधिकृत मान्यता दिलेली आहे.
– योगेश दोडके, अध्यक्ष, राष्ट्रीय तालीम संघउत्तर प्रदेश येथे भारतीय कुस्ती महासंघाची सर्वसाधारण सभा झाली असून, त्यामध्ये बाळासाहेब लांडगे यांच्या परिषदेची संलग्नता रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता खासदार रामदास तडस यांचीच अधिकृत कार्यकारिणी असून, तिलाही लवकरच सर्व अधिकार मिळतील.
-संदीप भोंडवे, अध्यक्ष, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटना