

पुणे : पुढारी वृत्तसेवा : येत्या तीन दिवसांत राज्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाचा जोर राहील. विजांचा कडकडाट, गारपीट व हलका ते मध्यम पाऊस होईल. त्याचबरोबर कोकण, विदर्भात उष्णतेची लाट तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रविवारपासून (दि. 16) संपूर्ण महाराष्ट्रात वळवाचे वातावरण निवळण्याची शक्यता होती. मात्र आता केवळ कोकणातील 4 आणि विदर्भातील 11 अशा एकूण 15 जिल्ह्यांत दोन दिवसांकरिता पाऊस थांबणार आहे. परंतु मंगळवारपासून (दि. 18) पुन्हा या ठिकाणी पावसाळी वातावरणाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील 10 व मराठवाड्यातील 8 अशा एकूण 18 जिल्ह्यांत रविवारपर्यंत (दि. 23) वळवाची शक्यता वाढली आहे.
जोपर्यंत दक्षिण भारतातील 'वारा खंडितता प्रणाली' बदलत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातील अवकाळी वातावरण पूर्णपणे निवळण्याची शक्यता कमी आहे. समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत हवेचा निर्वात जाडीचा थर झारखंडपासून ओडिशा, आंध्र प्रदेश ते तामिळनाडू राज्यांपर्यंत पसरलेला आहे. साधारण एक महिन्याच्यावर ही प्रणाली टिकून आहे. या कालावधीपूर्वी मध्य भारतात दोन्ही बाजूला समुद्रसपाटीपासून साधारण 900 मीटर उंचीपर्यंत तयार झालेली दोन हवेच्या उच्च दाबाची क्षेत्रे व त्यांच्या निर्मितीमुळे गोलाकार प्रत्यावर्ती चक्रीय वारे वाहत आहे. आता अशा दोन क्षेत्रांमधून महाराष्ट्राच्या भूभागावर पूर्व-पश्चिम कित्येक कि.मी. रुंदीचा व 900 मीटर उंचीपर्यंत हवेच्या निर्वात जाडीचा कमी दाबाचा पट्टा म्हणजे 'आस' (ट्रफ) तयार झाला आहे. या वारा खंडितता प्रणालीमुळे सध्या राज्यावर घोंगावत असलेले गारपीट व अवकाळी वातावरण 23 एप्रिलपर्यंत राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.