महाराष्ट्राभर उष्णतेची लाट; पाचोर्‍यात उष्माघाताने राज्यातील पहिला बळी | पुढारी

महाराष्ट्राभर उष्णतेची लाट; पाचोर्‍यात उष्माघाताने राज्यातील पहिला बळी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात अवकाळी पावसासोबतच उष्णतेचीही लाट सक्रिय झाली असून, बुधवारी पुणे जिल्हा राज्यात सर्वाधिक तापल्याची नोंद झाली. शहरातील कोरेगाव पार्क भागाचे तापमान राज्यात सर्वाधिक 41.9, तर त्यापाठोपाठ विदर्भातील चंद्रपूरचे तापमान 41.8 अंशांवर गेले होते. दिवसा कडक उन्हाने अंगाची काहिली होत असून, सायंकाळी मात्र सोसाट्याच्या वार्‍यासह गारपीट, असे विचित्र वातावरण राज्यात तयार झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात उष्णतेची लाट सक्रिय झाली असून, राज्याचे सरासरी कमाल तापमान 3 ते 5 अंशांनी वाढले. त्यामुळे बहुतांश शहरांचे तापमान 38 ते 40 अंशांवर गेले आहे. राज्यातील बहुतांश शहरांचे तापमान 38 ते 39 अंशांवर गेले आहे. त्यात पुणे जिल्हा सलग दुसर्‍या दिवशी आघाडीवर होता. कोरेगाव पार्क (41.9), शिरूर (41.7), वडगाव शेरी (41), राजगुरुनगर (40.7), खेड (40), चिंचवड (40.1), शिवाजीनगर (38.8) इतके तापमान नोंदविले गेले.

राज्यातील प्रमुख शहरांचे बुधवारचे तापमान…
मुंबई 33.6, रत्नागिरी 32.5, पुणे 38.8, लोहगाव 39.2, कोरेगाव पार्क (पुणे) 41.9, अहमदनगर 39.4, जळगाव 41.6, कोल्हापूर 37.7, महाबळेश्वर 31.1, नाशिक 38.5, सांगली 37.9, सातारा 38.1, सोलापूर 40.6, छत्रपती संभाजीनगर 38.1, परभणी 40.2, नांदेड 38.4, बीड 39.8, अकोला 39.9, अमरावती 39.6, बुलडाणा 39.2, ब—ह्मपुरी 41.0, चंद्रपूर 41.8, गोंदिया 37, नागपूर 39, वाशिम 37.6, वर्धा 40.9, यवतमाळ 39.5.

Back to top button