पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संंख्येने चिंता वाढवली आहे. राज्यात बुधवारी (12 एप्रिल) 1115 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर 9 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या 5421 इतकी आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
कोरोनाबाधितांची संख्या एप्रिल महिन्यात झपाट्याने वाढत आहे. राज्यात दैनंदिन रुग्ण दुपटीचा वेग 10 दिवसांपर्यंत कमी झाला आहे. 2 एप्रिल रोजी दैनंदिन रुग्णसंख्या 562 इतकी होती. सक्रिय रुग्णसंख्या 15 दिवसांमध्ये दुप्पट झाली आहे. यापूर्वी 29 मार्च रोजी सक्रिय रुग्णसंख्या 2506 इतकी होती. रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के आणि मृत्यूदर 1.82 टक्के आहे. सध्या सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईमध्ये (1577) आहेत. त्यानंतर, ठाण्यामध्ये 953, तर पुण्यामध्ये 776 सक्रिय रुग्ण आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.