नवी दिल्ली /पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवामान खात्याने देशात यंदा मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज मंगळवारी वर्तवला आहे. विशेष म्हणजे मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याने देशवासीयांना उकाड्यापासून दिलासा मिळेल. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या वर्षी सरासरी 96 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. मान्सूनसंदर्भात हवामान विभागाने वर्तविलेला हा पहिला अंदाज असून दुसरा अंदाज मेमध्ये येईल. दरम्यान, पावसाच्या शुभवर्तमानामुळे अन्नधान्याचे चांगले उत्पादन होऊन महागाईपासून आम जनतेला दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यापूर्वी खासगी हवामान संस्था स्कायमेटने यंदा 94 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला होता. सामान्यतः एक जूनच्या दरम्यान देशात मान्सूनचे आगमन होते. किनारी भागातील केरळमध्ये या काळात मान्सून दाखल होतो. दक्षिणेत मान्सून दाखल झाल्यानंतर तो देशाच्या इतर भागांत पोहोचतो. स्कायमेटच्या अंदाजानंतर शेतकर्यांची निराशा झाली होती. तथापि, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदा देशात दीर्घ कालावधी सरासरीच्या 96 टक्के पाऊस होऊ शकतो.
सरासरीच्या 90 ते 95 टक्के पाऊस झाला तर त्याला समाधानकारक म्हटले जाते. मात्र, तो 110 टक्क्यांपेक्षा जास्त बरसला तर त्यास अतिवृष्टी म्हटले जाते. तसेच 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस म्हणजे दुष्काळ होय.
अर्थव्यवस्थेसाठी चांगल्या पावसाची गरज
देशात वर्षभर जेवढा पाऊस होते, त्यापैकी 70 टक्के पाऊस नैऋत्य मोसमी वार्यांमुळे म्हणजेच मान्सूनमुळे पडतो. आजही आपल्या देशातील 70 ते 80 टक्के शेतकरी सिंचनासाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पादन सर्वस्वी पावसावर अवलंबून असते. पावसाळ्यात कमी पाऊस झाला तर त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळतो.
भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा 20 टक्क्यांच्या आसपास आहे. कृषी क्षेत्र आपल्या देशातील निम्म्या लोकसंख्येला रोजगार प्रदान करते. त्यामुळे चांगला पाऊस म्हणजे यंदा निम्म्या लोकसंख्येच्या उत्पन्नात सणासुदीपूर्वी चांगली वाढ होऊ शकते. यामुळे त्यांची त्यांची खर्च करण्याची क्षमताही चांगलीच वाढेल. मान्सून चांगला बरसला तर अन्नधान्याचे उत्पादन उत्तम प्रमाणात होते. त्याचा फायदा होतो. ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान अल निनोचा प्रभाव दिसू शकतो. संपूर्ण जगातील हवामानावर त्याचा प्रभाव पडतो. भारतात दक्षिण-पश्चिम मान्सूनवर याचा प्रभाव पडतो. यामुळे हवामान कोरडे बनते. तसेच मान्सूनमध्ये पाऊस कमी पडतो. विशेष म्हणजे पुढील पाच दिवसांत देशातील अनेक भागांत तापमानामध्ये 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अल निनोचा मान्सूनशी संबंध 40 टक्केच…
हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले, आजवर 15 वेळा अल निनो सक्रिय असताना मान्सून 6 वेळा अतिवृष्टी देऊन गेला आहे; अन्यथा तो साधारण पाऊस देऊन गेला. अल निनोचा मान्सूनशी 40 टक्के संबध गृहीत धरला जातो, त्यामुळे जुलैनंतर पाऊस कमी पडेल, हा फक्त अंदाज काही शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. पण आयओडी (भारतीय समुद्री स्थिरांक) व युरेशियातील बर्फाच्छादन ही परिस्थिती भारतीय मान्सूनला सकारात्मक आहे, त्यामुळे भारतात मान्सून चांगला बरसेल.