भाजप जगभर पोचला हा मोदी यांचाच करिश्मा : अजित पवार

भाजप जगभर पोचला हा मोदी यांचाच करिश्मा : अजित पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार आपल्या नियोजित कार्यक्रमासाठी शुक्रवारी दुपारी हडपसर भागात जाण्यासाठी निघाले असतानाच वाटेत शरद पवार यांचा फोन आला… अन् त्यांनी सोबत असलेल्या सहकार्‍यांना सोडून यू टर्न घेतला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्यानंतर ते कुठे गेले त्याचा पत्ता आज सकाळपर्यंत लागला नव्हता. त्यांच्या नॉट रिचेबल असण्याचे कारण शनिवारी सकाळी त्यांनी स्वत:च पत्रकार परिषदेत दिले. पित्ताच्या त्रासामुळे आपण विश्रांती घेत होतो, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर दुपारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी गौरवोद्गार काढल्याने राजकीय भाकितांना पुन्हा ऊत आला.

अजित पवार यांच्या नियोजित कार्‍यक्रमानुसार काल सकाळी ते बारामती होस्टेल येथे आले. त्यांचे हडपसर भागात तसेच पुण्यातही काही कार्यक्रम होते. त्यानंतर रात्री माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांच्या मांजरी येथील निवासस्थानी भोजन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्याचा कार्यक्रम होता. त्यातील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमास ते मांजरीला जाण्यास निघाले.

त्यांच्या बरोबर पक्षाचे स्थानिक नेते आणि नेहमीचा ताफाही होता. ते कोरेगाव पार्क भागात पोचले असतानाच त्यांना फोन आला आणि तो शरद पवार यांचा असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्या फोननंतर त्यांनी आपल्या सोबत्यांना सोडले आणि गाडीने यू टर्न घेतला. शरद पवार शुक्रवारी दिल्लीहून मुंबईला आले होते. अजित पवार त्यांना भेटण्यासाठी गेले का काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.

पवार हे पुणे दौर्‍यावर असताना अचानक दौरा रद्द करून आणि पोलिस संरक्षण सोडून ते 'नॉट रिचेबल' झाल्याच्या बातम्या शुक्रवारी (दि.7) वृत्तवाहिन्यांवरही झळकल्या. मात्र स्वत: अजित पवार यांनी आपल्याला पित्ताचा त्रास झाल्याचे कारण पत्रकार परिषदेत सांगितले. शनिवारी सकाळी आठ वाजता पवार यांनी खराडीतील एका कार्यक्रमास हजेरी लावली. या वेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी 'नॉट रिचेबल' होण्याचे कारण स्पष्ट केले.

ते म्हणाले, पुण्यात शुक्रवारी दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरू होता. मात्र, गेले काही दिवस मी महाराष्ट्रभर दौर्‍यावर होतो. या दौर्‍याच्या काळात प्रचंड दगदग झाली, विश्रांती मिळाली नाही, झोपही पूर्ण होत नव्हती. त्यामुळे पित्त वाढले आणि तब्येत बिघडली होती. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला आणि औषधे घेऊन पुण्यातल्या 'जिजाई' या निवासस्थानी विश्रांती घेतली. माध्यमांनी चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे विनाकारण आपली बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त करत खात्री करूनच बातम्या देण्याची सूचना त्यांनी या वेळी केली.

हा मोदींचाच करिश्मा
पुण्यातील दुसर्‍या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा आणखी एक धक्का दिला. तुम्हाला काय वाटते याच्याशी
मला देणे-घेणे नाही. ज्या पक्षाचे दोनच खासदार होते, तो पक्ष आज मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेली नऊ वर्षे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. आज जगभर त्यांचा पक्ष पोचला हा करिश्मा मोदी यांचाच आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि वेगवेगळी भाकिते रचण्यास सुरुवात झाली.

सावरकरांबाबत भाजपच्या भूमिकेशी सुसंगत भूमिका
या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या वादाबाबतही भाजपने घेतलेल्या भूमिकेशी सुसंगत मत व्यक्त केले. आपल्या देशात अनेक महापुरुष होऊन गेले. त्या महापुरुषांचा उल्लेख केला, तर त्यांच्याबद्दल आदरच दाखवला पाहिजे. ती आपली संस्कृती आणि परंपरा आहे. त्यातून कारण नसताना नवीन प्रश्न निर्माण करण्याची गरज नाही, असे मत त्यांनी सावरकरांच्या प्रश्नावर व्यक्त केले.

ईव्हीएमवर विश्वास
ईव्हीएममुळेच भाजप विजयी होत असल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपेतर पक्ष करीत असतानाच अजित पवार यांनी ईव्हीएमवर विश्वास व्यक्त केला. जर ईव्हीएममध्ये गडबड असती, तर पंजाबमध्ये आपचे सरकार आले नसते. पश्चिम बंगालसह विविध राज्यांत भाजप विरोधी सरकार आहेत. त्यामुळे ईव्हीएमला दोष देण्यात काही अर्थ नाही. माझा वैयक्तिक ईव्हीएम मशिनवर विश्वास आहे. पराभव झाला की ईव्हीएमला दोष द्यायचा आणि विजय झाला की सगळे आलबेल आहे, असं म्हणायचे, हे बरोबर नाही, असे मत पवार यांनी व्यक्त केले.

शरद पवारांची भूमिका हीच आमची भूमिका
शरद पवार यांनी अदानी यांच्यासंदर्भात जी भूमिका एका मुलाखतीमध्ये जाहीर केली, तीच भूमिका आमची व पक्षाची आहे. ते आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी एखादी भूमिका मांडल्यानंतर पुन्हा आम्ही त्याबद्दल बोलू शकत नाही, असेही अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौर्‍यावरील प्रश्नावर अजित पवार म्हणाले, आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. इथे वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे आणि पंथांचे लोक राहतात. इथला प्रत्येक जण वाटेल तिथे दर्शनासाठी जाऊ शकतो. मी पण दर्शनाला जातो. मी कधी दर्शनाला गेलो, तर त्याची इतकी कुठे प्रसिद्धी करीत नाही. माध्यमांनी लोकांचे दैनंदिन जीवनामध्ये महागाई, बेरोजगारी, कायदा-सुवस्था, कोरोना या महत्त्वाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे.

विकास करताना पर्यावरणाचे संतुलन राखा
पुणे महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या नदी सुधार प्रकल्पाबाबत पवार म्हणाले की, या प्रकल्पामुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा येणार नाही, याची काळजी जलसंपदा विभागाने घ्यावी, त्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने उपाययोजना कराव्यात आणि पुणेकरांचे नुकसान होणार नाही, असा निर्णय घ्यावा. विकास करताना पर्यावरणाचेही संतुलन राखणे गरजेचे आहे, असेही अजित पवार म्हणाले.

पुण्यात बिनविरोध निवडणुकीची चर्चा नाही
लोकसभा निवडणुकीला एक वर्ष आणि काही महिने राहिले आहेत. त्यामुळे पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगच निर्णय घेईल. निवडणूक आयोगाने अजून पोटनिवडणुकीची घोषणा केली नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करणे योग्य नाही. रीतसर घोषणा झाल्यावर सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन ठरवतील. बिनविरोध निवडणूक होणार, अशी चर्चा झालीच नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news