हिंगोलीचे दुर्गसावंगीकर महाराजांच्या चमत्काराच्या दाव्याचा पर्दाफाश ; वाचा सविस्तर | पुढारी

हिंगोलीचे दुर्गसावंगीकर महाराजांच्या चमत्काराच्या दाव्याचा पर्दाफाश ; वाचा सविस्तर

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  हल्ली चुलीवरील बाबा ते पाण्यावर तरंगणार्‍या बाबांची जोरदार चर्चा सुरू आहे. पाण्यावर तरंगणारे ह.भ.प. हरिभाऊ महाराज दुर्गसावंगीकर हे पाण्यावर तरंगण्यासाठी वेद व ग्रंथ वाचनामुळे मला विद्या प्राप्त झाल्याचे सांगत आहेत. तर पाण्यावर तरंगण्याची कला असल्याचे सांगत पोहोण्याच्या सरावाने ती कला कोणीही आत्मसात करू असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी विहीरीमध्ये उडी घेत दिवसभर तरंगताना दिसून आले. त्यामुळे हिंगोलीचे ह.भ.प. दुर्गसावंगीकरांच्या चमत्काराच्या दाव्याचा पर्दाफाश केला आहे.

हिंगोली जिल्ह्यात ह.भ.प. दुर्गसावंगीकर महाराज यांनी धोत्रे गावात हरिनाम सप्ताह आयोजित केला. त्या सप्ताहात किर्तन संपताच महाराज लगतच्या विहीरीमध्ये उडी घेत तरंगताना मंत्रोच्चार करीत. हे पाहण्यासाठी हजारोंची गर्दी हिंगोली जिल्ह्यातील धोत्रे गावात जमा होऊ लागली. संबंधित महाराजांनी पाण्यावर तरंगण्याची विद्या ही वेद व ग्रंथ वाचनानंतर मिळते. व ती वेद व ग्रंथाच्या वाचनातूनच ती विद्या मला आत्मसात असल्याचा दावा त्यांनी केल्याने राज्यभर चर्चा सुरू झाली. एवढेच नव्हे तर संबंधित महाराजांच्या दाव्याला अंनिस संघटनेने आव्हान दिले होते.

दरम्यान, पाण्यावर तरंगण्याची ही एक कला असल्याचे दाखवून देण्याचे काम मोरे यांनी केले आहे. राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोरे हे शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत शासनविरोधात लढा देत असतात. मोरे यांनी टाकळीमिया गावामध्ये असलेल्या पाण्याने भरलेल्या विहीरीत उडी घेत तासन तास पाण्यावर तरंगत कलेचे सादरीकरण केले. पाण्यात तरंगलेले असतानाच मोरे यांनी सांगितले की, पाण्यावर तरंगण्याची कला ही सरावाने लाभते. मी तासन तास पाण्यात तरंगत असतो. त्यासाठी मी अनेक वर्षांपासून सराव केला. लहानपणापासूनच पाण्यात पोहोण्याचा छंद होता. तो छंद जोपासत असतानाच मला पाण्यात तरंगत राहण्याची कला आत्मसात झाली. कोणतीही दैवी शक्ती किंवा अंधश्रद्धा नसून केवळ पाण्यात तरंगण्यासाठी सराव महत्वाचा ठरल्याचे सांगितले.

लहानपणी शाळेत जात असतानाच पाण्यावर तरंगण्याचा छंद

शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी सांगितले की, लहानपणी शाळेतून पळ काढत आम्ही मित्र कंपनी विहिरीत पोहोण्यासाठी एकत्र जमायचो. त्यावेळी पाण्यात तरंगण्याचा सराव करीत होतो. पोहोण्याचा छंद व तरंगण्याची कला आत्मसात करताना मला पोटात हवेचा बॅलन्स व श्वास घेण्यात यश आले. त्यामुळे मी दिवसभर पाण्यात राहून तरंगत राहू शकतो असे सांगितले.

Back to top button