रसायनांचा वापर करून पिकविली जाताहेत फळे; भेसळ आरोग्यासाठी घातक | पुढारी

रसायनांचा वापर करून पिकविली जाताहेत फळे; भेसळ आरोग्यासाठी घातक

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : नैसर्गिक पद्धतीने फळे पिकण्यासाठी जास्त कालावधी लागतो. त्यामुळे फळे लवकर पिकावी, यासाठी फळ विक्रेत्यांकडून विविध प्रकारच्या रसायनांचा वापर होत असल्याचे आढळत आहे. पर्यायाने, सेंद्रिय घटक नष्ट होऊन रासायनिक घटकांची भेसळ वाढल्याने ही फळे आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून याबाबत तपासणी करून एप्रिल महिन्यापासून कारवाई सुरू केली जाणार आहे. जास्त उत्पन्न कमावण्यासाठी फळविक्रेत्यांकडून विविध प्रकारच्या फळांवर रासायनिक प्रक्रियेचे डोस दिले जातात. त्यामुळे नैसर्गिक कालावधीपूर्वीच फळे परिपक्व होत आहेत किंवा पिकवता येऊ लागली आहेत.

रोगप्रतिकारशक्तीसाठी फळे उपयुक्त
कोणतेही फळ रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करते. फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व आणि पोषकतत्त्वे असतात. फळांमध्ये पाण्याचा गुणधर्म अधिक प्रमाणात असल्याने उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. फळांच्या सेवनाने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. फळांच्या सेवनामुळे पाचनतंत्र सुधारण्यासदेखील मदत होते.

रसायनांचा वापर आरोग्यासाठी घातक
फळांना इंजेक्शन देऊन अनैसर्गिकरित्या पिकविण्यात येणारी फळे आरोग्याच्या दृष्टीने घातक असतात. त्यामुळे हार्मोन्समध्ये बदल होतो. कर्करोग होऊ शकतो. तसेच, विविध इन्फेक्शन वाढू शकतात. ज्यूस विक्रेत्यांकडून फळांचा रस घेताना खराब झालेली फळे तपासली जात नाहीत. त्याचप्रमाणे, घरासाठी फळे घेताना शेतकर्‍यांकडून किंवा नैसर्गिकरित्या फळे पिकविणार्‍या फळविक्रेत्याकडून घेण्यावर भर द्यायला हवा, असे मत जनरल सर्जन डॉ. संजीव दात्ये यांनी व्यक्त केले.

अन्न व औषध प्रशासन कारवाई करणार
सध्या विविध फळांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. शहरात ठिकठिकाणी फळविक्रेते आंबा, चिकू, सफरचंद, केळी, कलिंगड, खरबूज यांची विक्री करताना दिसत आहेत. बाजारातील ही फळे खरोखरच नैसर्गिकरित्या पिकवली जात आहे का? याचे परीक्षण अन्न व औषध प्रशासन विभागाकडून केले जात आहे. एप्रिल महिन्यापासून याबाबत कारवाईदेखील केली
जाणार आहे.

फळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर
पपईसह टरबुजांचा आकार वाढविण्यासाठी स्टेरॉइडचे इंजेक्शन दिले जाते. त्याचप्रमाणे टरबूज पिकविण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शनचा वापर केला जातो. त्यामध्ये सिंथेटिक रंगही मिक्स केलेला असतो. तसेच, सॅक्रीनचा वापर करून टरबूज गोड केले जातात. रसायनांद्वारे पिकविलेली फळे कापल्यानंतर फळांमध्ये तंतूसारखे जाळे तयार झालेले आपल्याला दिसते.

अनैसर्गिकरित्या किंवा केमिकलचा वापर करून फळे पिकवल्यास तसेच बाजारात विक्रीसाठी आणल्याचे निदर्शनास आल्यास अशा फळ विक्रेत्यांच्याविरोधात अन्नसुरक्षा कायद्यानुसार कारवाई केली जाते. सध्या इथेलिन लिक्विडचा फळे पिकविण्यासाठी वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे, रायपनिंग चेंबरमध्ये कच्ची फळे ठेवून पिकविली जातात. रसायनांचा वापर करून फळे पिकविणार्‍या विक्रेत्यांविरुद्ध एप्रिल महिन्यापासून कारवाई करण्यात येणार आहे.

                                                     – अर्जुन भुजबळ,
                          सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

Back to top button