कोयना परिसरात जाताय? तर, ही आकर्षक ठिकाणं नक्की बघा! | पुढारी

कोयना परिसरात जाताय? तर, ही आकर्षक ठिकाणं नक्की बघा!

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress
अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाई : खरंतर कोयना हा पाटण शहरातील छोटासा भाग. मात्र, पाटण शहराची ओळखच कोयना परिसरामुळे झाली. अशा लॅन्डमार्क असणाऱ्या कोयनेची ख्याती महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देशभर पसरलेली आहे. महाराष्ट्रची भाग्यलक्ष्मी, आशिया खंडातील एकमेव भूमिगत धरण, अथांग पसरलेला शिवसागर जलाशय, प्रचंड मोठे विद्युत प्रकल्प, १९७६ सालचा मोठा भूकंप, कोयना अभयारण्य आणि इथली मंदिरं, विविध स्थळांमुळे कोयना परिचित आहे. मात्र, एवढीच ओळख कोयनेची नाही. तिच्या पोटात अनेक प्रेक्षणीय स्थळे दडलेली आहे. त्यामध्ये ओझर्डे धबधबा, सुंदरगड, भैरवगड, रामबाण तीर्थक्षेत्र, प्रसिद्ध येराड देवस्थान, रूद्रेश्वर मंदीर, चाफळचं राम मंदिर, प्रति औदुंबर, पाटणकरवाड्यातील राम मंदिर, ग्रामदैवत लक्ष्मीदेवीचे मंदिर, नेहरु उद्यान, तारळी धरण, काठीटेक डोंगर, १४ वरगळी, वाल्मीक पठार, उलटा धबधबा, तारळे गावजत्रा, सडा वाघापूर-वनकुसावडे पवनचक्की प्रकल्प, मारूल नंदादीप उत्सव अशा वेगवेगळ्या ठिकाणांनी आणि धार्मिक परंपरांनी कोयना समृद्ध आहे. चला तर मग कोयनेचे दर्शन घेऊ…

Koyna
ओझर्डे धबधबा : या विशालकाय धबधब्यातून ९०० फुटावरून कोसळणारं पाणी पर्यटक चिंब भिजून जातो.

ओझर्डे धबधबा

पावसाळ्यात कोयना पर्यटन म्हटलं की, पहिल्यांदा नजरेसमोर उभा राहतो तो सुमारे ३५० मीटर उंचीवरून कोसळणारा ओझर्डे धबधबा. पावसाळ्यात कोयनानगरचा परिसर हिरवीगार शाल पांघरू लागला आहे. कोयनेतून केवळ १० किलोमीटरचे अंतर कापत असताना गर्द हिरवीगार झाडी, मोठमोठे वृक्ष, वळणावळणाचे रस्ते, शेजारीच पसरलेला शिवसागर जलाशय, जमिनीपर्यंत टेकलेल्या छपरांची घरे, भर पावसात शेतामध्ये भाताच्या रोपांची लागण करणाऱ्या महिलांचा समूह, बाजूलाच वाहणारी मातीच्या रंगाची कोयना नदी, छोटीछोटी दुकाने पाहत-पाहत आपण ओझर्डे धबधब्याशेजारी पोहोचतो. कोयनेतील पर्यटकांचे खास आकर्षण असणारा म्हणजेच ओझर्डे धबधबा. निसर्गरम्य परिसर आणि धबधब्याच्या पाण्यात ओलेचिंब होण्याचा आनंद वेगळाच अनुभव देणारा आहे.
दमदार आणि संततधार पावसाने निसर्ग या धबधब्याला पुन्हा जिवंत करतो. पाबळनाला धबधबा पाहिल्यानंतर थेट ओझर्डे धबधब्याकडे आपण प्रवास करतो. मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर मोठमोठ्या दगडी शिळा पाण्याच्या तडाख्याने गुळगुळीत झालेल्या निदर्शनास येतात. तसेच प्रवेशद्वारापासून कोसळणारा अन् फेसाळणारा धबधबा पाहिल्यानंतर पर्यटक वेगाने पायऱ्या चढायला लागतो.
जंगलातून चढ चढत असताना एका बाजूला फेसाळणारं पाणी, त्याचा विशिष्ठ आवाज, झाडांच्या खोडांवरून ओघळणारे पाण्याचे थेंब आणि त्यावर आलेली हिरवीगार शेवाळे, जाडजूड वेली, मध्येच लोखंडी कड्ड्यावर चिंब भिजल्यामुळे कुडकुडत असणारा माकडांचा समूह, मोठ्या धबधब्याला येऊन मिळणारे छोटेछोटे झरे, पारदर्शक पाण्यातून दिसणारा गुळगुळीत खडक, झाडांच्या पानांवरून ओघळणारे पावसाचे थेंब, पाहत-पाहत जवळपास ४०० पायऱ्या चढून आपण कधी धबधब्याजवळ पोहोचलो लक्षात येत नाही. जेव्हा विशालकाय धबधब्यातून जवळपास ९०० फूटावरून कोसळणारे पाणी पाहिले की, निसर्ग अफलातून आहे, असं वाटायला लागतं. कारण, पाण्याचा वेग, बाजूला पाऊस नसतानाही केवळ धबधब्याच्या पाण्याने उडणारे तुषार पर्यटकांनी चिंब भिजवून टाकतात. पूर्ण परिसर पाण्याच्या तुषारांनी भरलेला असतो. त्यामध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक कोयनेला भेट देत असतात. 
सुंदरगड (घेरादातेगड)
Ganpati
घेरादातेगड : जास्वंदी फुलाच्या आकारासारखे कान असलेला दुर्मीळ गणेशाची मूर्ती
पाटण शहराच्या वायव्य दिशेला पाहिले की, प्रचंड मोठा गड आपल्या नजरेला पडतो. त्यालाच घेरादातेगड म्हणतात. हा गड टोळेवाडी या गावामध्ये आहे. या गडाला सुंदरगड किंवा दंतगिरी असेही म्हंटलं जातं. विशेष म्हणजे किल्ल्यावर सहजपणे आपण दुचाकी किंवा चारचाकी घेऊन जाऊ शकतो. किल्ल्याच्या पायथ्यालाच ग्रामदैवत भैरीदेवीचे मंदीर आहे. गडाच्या पश्चिम बाजूस भग्न प्रवेशद्वार आहे. १९६७ साली झालेल्या कोयना भूकंपामध्ये हे प्रवेशद्वार कोसळले असल्याची माहिती स्थानिक लोक देतात. त्याठिकाणी जाण्यासाठी पश्चिम तटाजवळील कातळात खोदलेल्या सुमारे ३० पायऱ्या आहेत. त्या उतरल्यानंतर समोरच ६ फूट उंचीची जास्वंदीच्या फुलासारखे कान असलेली लाल रंगाची गणेशाची मूर्ती आहे. त्याच्या शेजारीच सुमारे १० फूट उंचीची मारुतीची मूर्ती आहे. शेकडो वर्षे झाली. मात्र, आजही या मूर्तींवर कोणत्याही प्रकारचा परिणाम झालेला दिसत नाही.
सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गडावर सुमारे १०० मीटर लांब आणि २०० फूट खोल तलवारीच्या आकाराची विहिर आहे. या विहिरीत उतरण्यासाठी अंदाजे ५० पायऱ्या आहेत. विहिरीत उतरून वरच्या बाजूला पाहिले की, विहिरीचा तलवारीसारखा आकार पर्यटकांच्या लक्षात येतो. काही पायऱ्या उतरल्यानंतर डाव्या बाजूला एक गुहा आहे. त्यात महादेवाची पिंड आणि भग्न झालेला दगडी नंदी आहे. तसेच इतक्या उंच ठिकाणी उन्हाळ्यातदेखील या विहिरीला पाणी असल्याचे दिसून येते. दातेगडावरील खडकात खोदलेली विहीर आणि टाकी यावरून हा किल्ला शिवपूर्व काळातला असल्याचे स्पष्ट होते. इतिहास असं सांगतो की, गडावर शिवाजी महाराजांनी स्‍थापन केलेली कचेरी व कायमची शिबंदी होती. या शिबंदीकरता गडाशेजारच्या गावातील जमिनी नेमून देण्यात आल्या होत्या. पुढे हा किल्ला काही काळ मोगलांच्या अधिपत्याखाली होता.

भैरवगड 

Maruti
घेरादातेगड : जांभा दगडात कोरलेली पूर्वला तोंड असलेली हनुमानाची मूर्ती
सातारा-रत्नागिरीच्या सीमारेषेवर कोयनानगरपासून २० किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्‍या पर्वतमाथ्यावर घनदाट जंगलाच्या सानिध्यात हा शिवकलीन भैरवगड आहे. हा भाग वनविभागाच्या अंतर्गत येतो. येथे जाण्यासाठी वनविभागाची परवानगी आवश्यक आहे. त्याचबरोबर पर्यटकांच्या समुहाला, तसेच चारचाकी असेल तरच ही परवानगी असते. कारण, कोयना अभयारण्यातील प्राणी खास करून गवरेड्यांचा कळप कधीही हल्ला करू शकतो. गडावर भैरवनाथाचे मंदीर आहे. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा आहे. मुख्य गड कोकणच्या बाजूच्या समोरील टेकडीवर आहे. गडावर जाण्यासाठी अवघड पायवाट चालत असताना ढासळलेल्या बुरुजांचे अवशेष आपल्या नजरेला पडतात. या बुरुजांवरून समोरचा निसर्ग पाहून व्यक्ती थक्क होतो. कारण, सह्याद्रीच्‍या पर्वतरांगांचा नैसर्गिक ठेवा आश्चर्यचकीत करायला लावणारा आहे.
 
गडावर टेहाळणी गुहा आहे. गुहेपर्यंत जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे. मात्र, गुहेत जाता येत नाही. गडावर शिवकालीन पडक्या वाड्यांचे अवशेष दिसतात. गडाच्या मार्गावर उभ्या कड्यात भुयारी पद्धत्तीने खोदलेले थंड पाण्याचे कुंड आहे. खरेतर भैरवगडाकडे जायचे म्हटले की, पायी भ्रमंती करणे आनंददायक आहे. हेळवाक, मेंढेघर, नाव, पाथरपुंज या गावांतून गडाकडे जाता येते. गडावरून पाटण येथील गुणवंतगड, घेरादातेगड नजरेला पडतात. गडाच्या पायथ्याशी कोकणमधील चिपळूण तालुक्यातील पात्रे, मजूत्तरी, रातअंबे, तळावडे, बल्लारमाच, धगरवाडा, गोऊळ गावे दिसून येतात. 

सडावाघापूर आणि वनकुसवडे 

पाटण तालुक्यात दोन महत्त्वाचे आणि आशिया खंडात प्रसिद्ध असणारे वीज प्रकल्प आहेत. एक आहे कोयनेचा भूमिगत वीज प्रकल्प आणि दुसरा आहे वनकुसवडेचा पवनऊर्जा प्रकल्प. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेल्या पश्चिम-उत्तर सह्याद्री पर्वताच्या वनकुसवडे पठारावर आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प उभारला आहे. त्याचबरोबर सडावाघापूर येथेही पवनचक्कीचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले आहे. पवनचक्कीचे भलेमोठे फिरणारे पाते जवळून पाहताना काळजात धस्स होते. १ हजार एकरमध्ये दोन हजार पवनचक्कीची पाती १२५० कि.वॅटच्या क्षमतेने वाऱ्याच्या जोरावर फिरतात. यापासून १००० मेगावॅट विजनिर्मिती होत आहे. पठारावर उंच पण, जमिनीला टेकतील अशा छपरांची घरे आपल्याला पाहयला मिळतात. 
Vanakusawade Wind Power Project
पवनउर्जा प्रकल्प : सडावाघापूर आणि वनकुसावडे या डोगंरांवर मोठमोठे पवनउर्जा प्रकल्प उभारलेले आहेत.
दुरून ही घरे छोटी आणि खुजी दिसत असली तरी एखाद्याा घरामध्ये प्रवेश केल्यानंतर घराचा आवाका आतून खूप मोठा असल्याचे लक्षात येते. घरामध्ये सुमारे १० जनावरे बांधली जातील इतका मोठा गोठा, त्याच्या सहा-सात खोल्या असतात. तसेच धान्य ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारची जमिनीमध्ये जागा तयार केलेली असते. पवनऊर्जा प्रकल्पामुळे या गावांमध्ये हळूहळू विकास होत आहे. या दोन्ही डोंगरावरून समोर पाहिले असता पाटण शहराचे विहंगम चित्र डोळ्यांसमोर दिसते. वळणवळणाचे मार्ग कापत वाहत जाणाऱ्या केरा आणि कोयना या नद्या, तसेच त्यांचा संगम, चोहो बाजूंनी पसरलेला सह्याद्री, अवघड असणारा घाटरस्ता, वेगाने वाहणारे वारे, परिसरात पसलेली लाल माती, छोटीछोटी काटेरी करवंदांची झाडे, प्रचंड मोठी दरी, दरीमध्ये वसलेली गावे आदी ठिकाणं डोळ्यांना सुखावून जाणारी आहेत. पवनचक्कीच्या पात्याआड सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्याचा आनंद वेगळाच आहे. पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे पाणी जेव्हा दरीमध्ये कोसळण्यासाठी येते. तेव्हा वाऱ्याचा प्रचंड वेग असल्यामुळे ते पाणी दरीत न जात वाऱ्यामुळे उलट्या दिशेने उडत राहते. त्यामुळे त्याला उलटे धबधबे म्हणतात. असे धबधबे पाहण्यासाठी, त्यामध्ये भिजण्यासाठी पर्यटक हमखास येतात.

श्री क्षेत्र येडोबा (येराड)

Yerad Temple
येराड मंदीर : महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेलं देवस्थान कोयना नदीच्या किनारी पाहायला मिळतं.
पाटण शहरापासून अवघ्या ४ किलोमीटर अंतरावर (कराड-चिपळूण रोडवर) येराड हे छोटेसे गाव आहे. डाव्या बाजूला संथ वाहणारी कोयना नदी आणि उजव्या बाजूला उंचचउंच सह्याद्रीच्या डोंगररांगा, यामधून प्रवास करत आपण या गावामध्ये प्रवेश करतो. १३ एकर परिसरात हे मंदिर उभारलं आहे. या ठिकाणाला ‘बनपेठ’ नावानेदेखील ओळखलं जातं. मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश केल्यानंतर दगडी नंदी आणि कासव मूर्ती आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताना दोन दगडी मूर्ती आहेत, त्यांना ‘रडवे’ म्हणतात. रडवेच्या पाठीमागील कथा अशी की, श्री येडोबा आणि देवी जोगेश्वरी यांच्या विवाहावेळी दोन भाऊ उपस्थित होते. मात्र, ते मानपमानासाठी हे दोघे भाऊ रुसून बसले होते. त्याचे प्रतीक म्हणजे हे रडवे आहेत. 
 
गाभाऱ्याच्या मध्यभागी येडोबा दैवत ठाण मांडून बसलेले आहेत. उजव्या बाजूला देवी जानुबाईची मूर्ती असून डाव्या बाजूस येडोबा देवाचे रक्षक उभे आहेत. सभामंडपाच्या डाव्या बाजूस उत्तराभिमुख शिवलिंग आहे. तसेच मंदिराच्या उत्तरेस देवी जोगेश्वरीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पुरातन काळातील अनेक दगडी मूर्ती आहेत. येराडची यात्रा खूप प्रसिद्ध आहे. यात्रेला महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. विशेष म्हणजे यात्रेतील ‘रिंगवण’ हा विधी खूप प्रसिद्ध आहे. हा विधी रात्री १२ वाजता संपन्न होतो. 
Pabalnala Waterfall
पाबळनाला धबधबा : कोयना परिसरात असे छोटे-मोठे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात
यामध्ये थोरवे घराण्यातील मानकरी नैवेद्याची तयारी करतात. नैवेद्य दाखविताना मंदिराचे दरवाजे आणि दारे, खिडक्या बंद केल्या जातात. त्याचबरोबर संपूर्ण गावातील दिवेदेखील बंद केले जातात. रिंगवनचे पाच मानकरी एकत्र येतात. त्यांच्यापुढे दिवटीवाला असतो. सर्वांची बसकन जमिनीवर असते आणि त्यांच्या सभोवती पडद्यांचे आवरण उभे केले जाते. गर्द काळ्या अंधारात मध्यरात्री १२ वाजता ५ मानकरी पडद्यांच्या आवरणासह चित्रविचित्र भयानक आवाज काढत मंदिराची प्रदक्षिणा मानकरी पूर्ण करतात. त्यावेळी सव्वा पायलीचा भात आणि नैवेद्य विस्कटून मंदिराच्या चोहोबाजूला टाकला जातो. नंतर नैवेद्यातील एकही शित जमिनीवर सापडत नाही, अशी प्रथा  राज्यभर प्रसिद्ध आहे. बाजूला वाहणारी संथ नदी, भव्य मंदिर, गावातील छोटीछोटी घरे, मोठमोठी फणस-आंब्याची झाडे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला उसाची आणि भाताची शेती, अशा निसर्गाच्या सानिध्यात हे येडोबा देवाचे दर्शन घेणे मोठी पर्वणीच म्हणावी लागेल. 

धारेश्वर दिवशी 

मुख्य शहरापासून उत्तर दिशेला १७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या धारेश्वर दिवशीमध्ये निसर्गाची अद्भूत किमया पाहायला मिळते. डोंगरांमधून प्रवास करताना पावसामध्ये नजरेला पडणारे दृश्य मनमोहक असते. कारण, येथे वाफ्यामध्ये केली जाणारी भातशेती, हिरव्यागार डोंगरांमध्ये निवांतपणे चरणारी जनावरे, त्यांची राखण करण्यासाठी आलेल्या ग्रामीण महिला, गावरान भाषेत बोलत नव्या पाहुण्यांशी आपुलकीने संवाद साधणारे गावकरी, बाजूलाच असणारी मोठी दरी आणि डोंगरावर उतरलेले ढग अशा नयनरम्य वातावरणात आपण धारेश्वर दिवशीच्या देवस्थानाकडे प्रवास करत असतो. 
Dhareshwar Divashi
धारेश्वर दिवशी : प्रचंड मोठ्या डोंगराच्या पोटात खोदलेल्या गुहेत शिवलिंगं आहेत आणि डोंगरावरून मोठमोठं धबधबे मंदिरासमोर कोसळतात
जेव्हा आपण मंदिराच्या परिसरात येतो तेव्हा पर्यटक आवक्  होतो. कारण, प्रचंड मोठा डोंगर अन् त्या डोंगराच्या पोटात खोदलेलं हे मंदिर पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. पावसामध्ये डोंगरावरून कोसळणार्‍या धारा गुहेतून पाहताना भक्त समाधानी होतो. या गुहेचे वैशिष्ट्य असे की, कोठेही खांब, भिंत नाही. तरीही ही गुहा शेकडो वर्षे टिकून आहे. परिसरात प्रवेश करताच ३ शिवलिंग नजरेला पडतात. असे सांगितले जाते की, रावणाने आपल्या पापक्षालनार्थ ९ कोटी लिंगे स्थापन करण्याचा संकल्प केला होता. त्यातील या तीन पिंडी आहेत. त्याचे पूजन केल्याने पितृदोष नाहीसा होतो. तेथील नवदुर्गांचे पूजन केल्यास घरातील अडचणी दूर होतात. त्याचबरोबर डोंगरावरून पडणाऱ्या धबधब्यात अंघोळ केल्यास त्वचेचे विकार नाहीसे होतात, असे सांगितले जाते.
गंगोत्री, जमनोत्री नावाचे दोन कुंड आहेत. देवस्थानतर्फे आजही ३५ गायी सांभाळल्या जातात. त्याचबरोबर देवस्थानची कामे किंवा गायीला चारा आणून देण्याचा मान शेजारच्या गावकऱ्यांना आहे. कोणताही मोबदला न घेतात संपूर्ण गाव या देवस्थानच्या कामासाठी एकत्र येते. ज्ञानेश्वरीमध्ये धारेश्वर दिवशीचा उल्लेख सापडतो, त्यामुळे या ठिकाणाला धार्मिक क्षेत्रात महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच असेही सांगितले जाते की, राम आणि पांडव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर १२ वर्षांनी त्रंबकेश्वर नाशिक येथील कुंभमेळ्यावेळी धारेश्वर धबधबा शिवशंभु महादेवाच्या पिंडीवरून भागीरथी दूधगंगा प्राप्त होते. त्यावेळी येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. येथील यात्रा दिवाळीत असते. या यात्रेत काठेपालखी मिरवणूक ही वैशिष्ट्य मानले जाते. काठेपालखीवर लोखंडी टोकदार सळ्यांच्या काठावर मानकऱ्यांना झोपवून त्यांची मंदिर परिसरातून मिरवणूक काढली जाते.

श्रीराम मंदिर (चाफळ आणि पाटणकरवाडा) 

Umbraj
चाफळ : चापळच्या प्रसिद्ध राम मंदिराकडे जाताना घाटातून जाताना वाटेतच डोंगरामध्ये हा फेसाळणारे धबधबा आहे.
पाटण शहाराच्या मध्यभागात सरदार नागोजीराव पाटणकर यांचा ऐतिहासिक वाडा आहे. या वाड्याला चारी बाजूंनी बुरूज आहेत. याला पाटणकर वाडा असेही संबोधले जाते. यामध्ये ऐतिहासिक राम मंदिर आहे. यापाठीमागे अशी कथा सांगितली जाते की, समर्थ रामदास स्वामी चाफळला एकटेच निघाले होते. वाटेत कोयना नदीला पूर आला. स्वामींनी चांदजीराव पाटणकर यांनी बोलवले होते. मात्र, त्यांना उशीर झाला म्हणून त्यांनी नदीतून पोहत येण्याचा विचार केला अन् नदीमध्ये उडी घेतली. मात्र, नदीमध्ये चक्राकृती भोवऱ्यात  ते अडकले आणि भोवऱ्यासरशी स्वामी नदीच्या तळात गेले. पाटणकर आणि इतर मंडळींना वाटले की स्वामी नदीत बुडाले. त्यांनी खात्री करून घेतली आणि घरी निघून गेले. 
 
स्वामी बुडून तीन दिवस झाले होते. मात्र, चाफळला निरोप मिळल्यानंतर कल्याण गोसावी आणि उद्घव गोसावी यांनी पाटणला भेट दिली. स्वामी बुडाले ते ठिकाणी पाहिले. तरीही कल्याण गोसावी यांनी नदीत उडी घेतली आणि नदीच्या तळात गेले. तर, तेथे स्वामी समर्थ पद्मासन घालून बसले होते. गोसावी यांनी स्वामींना नदीबाहेर आणले. तीन दिवसांनंतर पाण्यात राहून स्वामी परतल्‍याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. चांदजीराव पाटणकर आणि इतर मंडळींना स्वामींना साष्टांग दंडवत घातला. त्यावेळी स्वामींनी पाटणकर यांना श्री पट्टाभिरामचंद्राची पंचरसी धातूची मूर्ती दिली. या मूर्तीची पाटणकर वाड्यामध्ये आजही नित्यनियमाने सकाळी आणि सायंकाळी पूजा केली जाते.
छोटेसे टुमदार चाफळ हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कारण, श्री रामदास स्वामींच्या वास्तव्याने ही भूमी पावन झालेली आहे. समर्थ रामदास यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील सर्वात जास्त वर्षे त्यांनी चाफळमध्ये वास्तव्य केले हाेते. त्यामुळे या ठिकाणाला वेगळे महत्त्व आहे. १६४९ साली समर्थांनी श्रीराम मंदिराची स्थापना केली आहे. त्याची अशी कथा आहे की, समर्थांना कोरेगाव (ता. अंगापूर) येथे श्रीराम मूर्ती असल्याचा साक्षात्कार झाला. ते कोरेगावला गेले. कृष्णा नदीच्या डोहातून त्यांनी मूर्ती बाहेर काढली आणि सरळ चाफळला निघाले. मात्र, तेथील ग्रामस्थांनी त्यांनी अडविले आणि मूर्ती याच गावात स्थापन करा, असा हट्ट धरला. त्यामुळे समर्थांनी ग्रामस्थांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी ऐकले नाही. शेवटी समर्थांनी मूर्ती रस्त्यातच ठेवून निघून गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी ती मूर्ती हलविण्याचा प्रयत्न केला. शर्थीचे प्रयत्न करूनही मूर्ती एक इंचही जागेवरुन हलली नाही. ग्रामस्थांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी समर्थांची माफी मागितली. नंतर समर्थांनी चाफळ येथे १६४९ साली श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आणि त्या कोरेगावच्या ग्रामस्थांना श्रीराम जन्मोत्सोवात निशाणा धरण्याचा मान दिला. १६४९ पासून आजपर्यंत नियमितपणे जन्मोत्सोवस साजरा केला जातो. त्याचबरोबर समर्थांनी ११ क्षेत्रांमध्ये ११ मारूतींची स्थापना केली आहे. तसेच त्यामधील दासमारूती हा श्रीराम मूर्तीसमोर आणि श्रीराम मूर्तीच्या पाठीमागे २०० मीटर अंतरावर वीर मारुती आहे. अत्यंत निसर्गरम्य पावसाळी वातावरणात मंदिराला भेट देणं वेगळाच अनुभव गाठीला बांधण्यासारखा आहे. 
नंदादीप उत्सव
 
याशिवाय कोयनेच्या परिसरातील मारुल हवेली या गावामध्ये ‘नंदादीप उत्सव’ साजरा केला जातो. हा उत्सव श्रावण महिन्यात असतो. संपूर्ण महिनाभर महादेवाच्या मंदिरात हजारो समई रात्र-दिवस तेवत ठेवल्या जातात. हा उत्सव पाहण्यासाठी हजारो नागरिक या मंदिराला भेट देतात. भारसाखळे येथे ११ एकर परिसरात पसरलेल्या विस्तीर्ण जंगलाच्या मधोमध शंभू महादेवाचे मंदिर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे दाट जंगलातूनही मंदिराच्या कळसावर सूर्यकिरणे पडतात. ते पाहण्यासाठी पर्यटक येतात.
Patankar Ram Temple
राम मंदीर : पाटण शहरात पाटणकर सरदारांना मोठा वाडा आहे. त्यामध्ये रामदास स्वामी स्थापित हे राम मंदिर आहे.
पाटण तालुक्याचे वैशिष्ट्य म्हणजे पाटणमध्ये गुरेघर, तारळी, निवकणे, बिबी, उत्तरमांड अशी पाच धरणे आहे. या धरणांच्या ठिकाणी फिरण्यासाठीही लोक सुट्टीमध्ये जात असतात. तसेच येराडवाडी येथे सुमारे ३०० पायऱ्या चढून डोंगराच्या पोटात रुद्रेश्वराची गुहा आहे. गुहेमध्ये अनेक छोटेछोटे दगडाचे खांब तयार केले आहेत. तसेच डोंगरातून कोसळणारा धबधबा आणि धबधब्याच्या आतील बाजूला महादेवाचे शिवलिंग आहे. गुहेतून धबधबा पाहण्यासाठी लोक या ठिकाणाला आवर्जुन भेट देतात. आपणही या निसर्गाने नटलेल्या कोयना परिसरातील ठिकाणांना नक्की भेट द्या. कारण, निसर्ग आपल्याला साद घालतोय.
हे वाचलंत का? 

Back to top button