साखर उत्पादन घटूनही महाराष्ट्र देशात अग्रस्थानी; 115 लाख टन साखर अपेक्षित | पुढारी

साखर उत्पादन घटूनही महाराष्ट्र देशात अग्रस्थानी; 115 लाख टन साखर अपेक्षित

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील यंदाच्या ऊस गाळप हंगामाखेर 1 हजार 150 लाख टन ऊस गाळप आणि 115 लाख टन साखरेचे उत्पादन तयार होण्याचा साखर आयुक्तालयाचा सुधारित अंदाज आहे. गतवर्षीच्या तुलनेत ऊस उत्पादन 171 लाख टनांनी आणि साखरेचे उत्पादन 22 लाख टनांनी घटणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. असे असूनही देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी अग्रस्थानी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारला साखर आयुक्तालयाने ऊस गाळपाच्या स्थितीचा अंतिम सुधारित अहवाल नुकताच पाठविला असून, त्यामध्ये ही माहिती नमूद केली आहे. राज्यातील साखर कारखाने गतवर्षी 23 जून 2022 पर्यंत सुरू राहिले होते. चालूवर्षी मार्चअखेर बहुतांशी कारखाने बंद होण्याची दाट शक्यता आहे. काही मोजकेच कारखाने 15 एप्रिलअखेर सुरू राहू शकतील. त्यामुळे राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम गतवर्षापेक्षा सुमारे दोन ते अडीच महिने अगोदरच संपुष्टात येण्याची दाट शक्यता असल्याचे ते म्हणाले.

राज्यात गतवर्षी 1 हजार 321 लाख टनाइतके उच्चांकी ऊसगाळप पूर्ण होऊन 137.36 लाख टन साखरेचे उत्पादन हाती आले होते. चाल वर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीस 1 हजार 343 लाख टन उच्चांकी ऊस गाळप अपेक्षित धरण्यात आले होते. मात्र, हवामानातील बदलाचा फटका ऊस पिकास बसला आहे.

चालूवर्षी हंगामाच्या सुरुवातीस म्हणजे मे आणि जून महिन्यांत पाऊस नसल्याने उसावर विपरीत परिणाम झाला. तर नंतरच्या कालावधीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या महिन्यात सतत पाऊस राहिल्याने उसाच्या पिकाला पोषक स्थिती नव्हती. त्यातच खोडवा उसाचे प्रमाण अधिक राहिले. या सर्वांचा परिणाम उसाचे हेक्टरी उत्पादन 105 टनावरून 85 टनाच्या खाली आले आहे. त्यामुळे सुरुवातीच्या अंदाजापेक्षा 193 लाख टनांनी उसाची उपलब्धता कमी राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

उत्तर प्रदेश 102 लाख टनासह दुसरे
देशात महाराष्ट्राचे यंदाचे साखर उत्पादन 115 लाख टन, तर प्रमुख स्पर्धक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन 102 लाख टन होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे सलग दुसर्‍या वर्षी देशात महाराष्ट्राचे साखर उत्पादनातील अग्रस्थान कायम राहणार असल्याचेही साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले.

राज्यात शुक्रवारअखेर (दि.10) 1 हजार 2 लाख टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून, अद्याप 148 लाख टन ऊस गाळप बाकी आहे. तसेच सरासरी 9.94 टक्के उतार्‍यानुसार 98 लाख 51 हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. 207 पैकी 45 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, 162 साखर कारखाने सुरू आहेत. दैनिक 8 लाख 79 हजार 950 टन उसाचे गाळप सध्या सुरू आहे. याचा विचार करता, मार्चअखेर बहुतांशी कारखान्यांचा हंगाम संपेल.
                             पांडुरंग शेळके, साखर सह संचालक (विकास)

Back to top button