विधान भवनातून : कांदा-कापूस आणि गप्पांचे फड! | पुढारी

विधान भवनातून : कांदा-कापूस आणि गप्पांचे फड!

आज सकाळी विरोधकांनी विधान भवनात प्रवेश केला, तोच कांद्याच्या टोपल्या डोक्यावर घेऊन! त्यांच्या पाठोपाठ विदर्भ / मराठवाड्यातील आमदार कापसाला दर मिळावा, अशी मागणी करत विधान भवनात आले. गळ्यात कापसाच्या माळा, डोक्यावर कापसाचे गाठोडे अशा अवतारात हे आमदार विधान भवनाच्या पायर्‍यांवर ठाण मांडून बसले होते.
जोरदार घोषणा देत विरोधकांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला, तेव्हा अधिवेशन सुरू झाल्याची जाणीव झाली!

कट्ट्यावरचे गप्पांचे फड!

आशिष शेलार ही भाजपची तोफ सध्या ठाकरे गटाच्या कुणावर तुटून पडायचे याची वाटच पाहत असते. शेलार हे पक्ष संघटनेतून वर आल्याने सतत कार्यकर्त्याच्या भूमिकेत असतात. बातम्या देणारे असल्याने पत्रकारांचे तर ते आवडते! आज ते गप्पांच्या फडात सामील झाले होते. तेवढ्यात छगन भुजबळ तिथून जाताना थांबले. शेलार यांनी त्यांची विचारपूस केली, तेव्हा आपल्या नातींनी नेमबाजीत प्रावीण्य मिळवल्याची खूशखबर भुजबळांनी दिली. तुमचाच गुण तुमच्या नातींनीही घेतल्याचे एका पत्रकाराने म्हणताच, धनुष्यबाणाने नेमका वेध घेण्याचे प्रावीण्य तुमच्याकडेही आहे, असा शेरा शेलार यांनी मारला आणि एकच हशा पिकला. भुजबळ त्याच हशात सामील होत तिथून निघून गेले! शेलार यांनी आजच दिल्लीसारखाच मद्य सवलत घोटाळा ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्रातही झाला असल्याचा संशय व्यक्त करून सीबीआय त्याचीही चौकशी करू शकते, असे पिलू सोडून खळबळ उडवून दिली.

विधान भवनाच्या लॉबीत आणखी एक गप्पांचा फड रंगला होता. शिवसेना नेते अनिल परब या फडाच्या केंद्रस्थानी होते. ईडी चौकशी कशी होते, सीबीआय आणि इन्कम टॅक्सचे अधिकारी कशी चौकशी करतात याचे अनुभव परब पत्रकारांना सांगत होते. आजूबाजूने जाणारे नेते, आमदार परबांशी हात मिळवून दोन शब्द बोलून जात होते. त्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचाही समावेश होता.
विधान भवनात दुपारी प्रत्येक पक्षाच्या कार्यालयात जेवणावळी सुरू झाल्या आहेत. मात्र, ठाकरे गटाच्या आमदारांना कार्यालयच नसल्याने बसायचे कुठे, याची चिंता आहे. जेवणाचे डबे आले, पण ते कुठे बसून खायचे, असा प्रश्न ठाकरे गटाच्या आमदारांना पडलाय! मग, उपसभापती नीलम गोर्‍हे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची कार्यालये ही हक्काची ठिकाणे! ठाकरे गटाच्या नेत्यांचा या कार्यालयात ठिय्या असतो.

एखादा प्रश्न आपण मांडावा अशी इच्छा अनेक आमदारांची असते. एकाने प्रश्न मांडला, तरी त्याच प्रश्नावर बोलण्यासाठी इतरही नेते आग्रही असतात. विधानसभेत अंगणवाडी सेविकांच्या समस्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडल्या. त्यानंतर काँग्रेसचे नेते आणि नाना पटोले यांनीही उभे राहून याच विषयावर बोलायला सुरुवात केली. पवारांनी हा विषय आधीच मांडल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निदर्शनास आणूनही पटोले बोलतच होते. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उठले आणि त्यांनी तुमचा विरोधी पक्षनेता एकच आहे की दोन्ही पक्षांचे नेते वेगवेगळे आहेत, असा टोमणा मारला.

अहो नाना, अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. आता तुम्ही सभात्याग करा म्हटले तरीही कुणीही बाहेर गेले नाही, असे शिंदे यांनी ऐकवताच सभागृहात एकच हशा पिकला. पटोलेंना यावर काय बोलावे, हे न सुचल्याने तेही हसू लागले.
 

                                                                                                                                         – उदय तानपाठक

Back to top button