१२ वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांच्या चुका; प्रश्नांऐवजी छापून आली उत्तरे | पुढारी

१२ वी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत ६ गुणांच्या चुका; प्रश्नांऐवजी छापून आली उत्तरे

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चूका आढळल्या आहेत. प्रश्नांऐवजी थेट उत्तरच मिळाल्याने विद्यार्थी गोंधळून गेले.

परीक्षेच्या पहिल्याच दिवशीच हा प्रकार समोर आल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. बारावीचा मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता. इंग्रजी विषयाच्या पेपरमधील काही प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांनी कनिष्ठ पर्यवेक्षकांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर पर्यवेक्षकांनी ही बाब वरिष्ठांना कळविली. प्रश्न क्र. 3 (अ) हा कवितेवरील ऍक्टीव्हीटीवरील प्रश्न होता. यात अ-3, अ-4, अ-5 असे प्रत्येकी दोन गुणांचे तीन प्रश्न विचारण्यात आले होते. हे प्रश्नच विद्यार्थ्यांना समजले नाहीत. अगोदरच इंग्रजीचा पेपर आणि त्यात चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थी चक्रावून गेले होते. नंतर थेट उत्तरच छापल्याचे अनेकांच्या निदर्शनास आले. दरम्यान, परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटाचा कालावधी वाढवून देण्यात आल्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटीबाबत मुख्य नियामकांची संयुक्त सभा पुन:श्च आयोजित करण्यात येणार असून त्यात प्रश्नपत्रिकेतील त्रुटीबाबत संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येणार आहे. प्रचलित पध्दतीप्रमाणे इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्या समवेत आयोजित करण्यात आली होती. शिक्षकांनी धोरणात्मक मागण्यांबाबत बहिष्कार टाकल्यामुळे ही सभा होऊ शकली नाही.

– अनुराधा ओक, सचिव, राज्य मंडळ

Back to top button