गुजरातसह महाराष्ट्र, गोव्यात उष्णतेचा प्रकोप; कोकणाचा पारा 40 अंशांवर जाणार.. | पुढारी

गुजरातसह महाराष्ट्र, गोव्यात उष्णतेचा प्रकोप; कोकणाचा पारा 40 अंशांवर जाणार..

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फेब्रुवारीतच कमाल तापमानाचा पारा गुजरातमधील भूज शहराने पार केला असून, यापूर्वी फेब्रुवारीत 38.9 अंशांचा विक्रम या तापमानाने मोडला आहे. त्या पाठोपाठ महाराष्ट्र व गोवाही तापला असून, 16 फेब्रुवारी रोजी मुंबईचा पारा 37.5, तर गोव्यातील पणजी शहराचे तापमान 38.2 अंशांवर गेले.

आजवर फेब्रुवारीतच कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेल्याची फार कमी उदाहरणे आहेत. गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी गुजरातमधील भूज शहराने हा विक्रम यंदा केला असून, मार्च महिना उगवण्यास अजून बारा दिवस बाकी आहेत. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कसा असेल याची कल्पना फेब्रुवारीतच येत आहे. या पूर्वी दक्षिण भारतातील भुवनेश्वर येथे 20 फेब्रुवारी 2016 रोजी पारा 40 अंशांवर गेला होता. शुक्रवारी 16 रोजी अहमदाबादचा पारा 38.3 गेला. या पूर्वी 28 फेब्रुवारी 1953 मध्ये पारा 40 अंशांवर गेला होता. आगामी दोनच दिवसांत तळकोकणचा पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता असून, पुणे 34 अंशांवर स्थिर राहील.

हे तापमान खरे असून, आमच्या ऑटोमॅटिक वेदर स्टेशनची आकडेवारी आहे. भूजचा पारा 40 अंशांपेक्षा जास्त गेला आहे. दरवर्षी मार्च महिन्यात पारा चाळीशी गाठतो, यंदा फार लवकर पारा 40 पार गेला आहे.

                                              – डॉ. के.एस.होसाळीकर, प्रमुख, पुणे वेधशाळा.

सिमला, मनाली तापले..
शुक्रवारी देशात बहुतांश ठिकाणचा पारा 7 ते 10 अंशांनी वाढला आहे. यात गुजरात, महाराष्ट्र, गोवा नंतर राजस्थान राज्यातील गावे तापली आहेत. शुक्रवारी थंड हवेचे तापमान 21.7, तर मनाली 18 अंशांवर गेले. या दोन्ही ठिकाणी पारा 7 ते 10 अंशांनी वर गेला.

Back to top button