पुण्यात होणार कचर्‍यापासून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प; देशातील पहिलाच प्रयत्न | पुढारी

पुण्यात होणार कचर्‍यापासून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प; देशातील पहिलाच प्रयत्न

पुणे : घनकचर्‍यातून हायड्रोजन गॅसची निर्मिती करणारा देशातील पहिला प्रकल्प पुण्यात हडपसरला उभा राहणार आहे. द ग्रीन बिलियन्स या कंपनीने या संदर्भात पुणे महापालिकेशी 30 वर्षांचा करार केला आहे. या प्रकल्पावर 430 कोटी रुपये खर्च होतील, अशी माहिती या कंपनीच्या एका अधिकार्‍याने मंगळवारी दिली.

शाश्वत ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रात काम करणार्‍या द ग्रीन बिलियन्स लि. (टीजीबीएल) या कंपनीतर्फे हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आम्ही दररोज 350 टन घनकचर्‍यावर प्रक्रिया करू आणि त्यातून दररोज 10 टन इतका हायड्रोजन तयार करू, असे या कंपनीचे अध्यक्ष आणि संस्थापक प्रतीक कनाकिया यांनी सांगितले. पुण्यातील हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये हा प्रकल्प आम्ही उभारत आहोत. कचर्‍यापासून हायड्रोजन काढण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयत्न आहे. कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका आमच्या कंपनीला प्रति टन 347 रुपये टीपिंग शुल्क देईल, असेही ते म्हणाले.

नोव्हेंबर 2024 पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
या प्रकल्पातील पहिली 10 टनांची भट्टी नोव्हेंबर 2023 पर्यंत स्थापित केली जाईल आणि संपूर्ण संयंत्र नोव्हेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे, असे कनाकिया यांनी सांगितले.

Back to top button