बीड, औरंगाबाद, राजापूर येथील पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम फेब्रवारी अखेरपासून सुरू होणार | पुढारी

बीड, औरंगाबाद, राजापूर येथील पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम फेब्रवारी अखेरपासून सुरू होणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील अतिशय पुरातन असलेल्या नऊ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम तज्ज्ञ कारागिराच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. त्यापैकी बीडमधील पुरूषोत्तम पुरी, औरंगाबाद येथील खंडोबा आणि राजापूरमधील धूतपापेश्वर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या निविदा तसेच निधी रस्ते विकास महामंडळाकडे सुपूर्त होणार आहे.

राज्यातील अतिशय पुरातन मंदिराची दुरूस्ती आणि संवर्धन करण्यात येणार आहे. त्यापैकी नऊ मंदिरांचे काम पहिल्या टप्प्यात होणार आहे. त्यानुसार कार्ला (एकविरा देवी), शिवमंदिर मार्केड (चार्मोशी, गडचिरोली), आनंदेश्वर (लासूर, अमरावती), भगवान पुरूषोत्तम ( पुरूषोत्तमपुरी, बीड), कापेश्वर (खिद्रापूर,कोल्हापूर), खंडोबा (सातारा, औरंगाबाद), गोदेश्वर (सिन्नर, नाशिक), धूतपापेश्वर ( राजापूर- रत्नागिरी) आणि उत्तेश्वर या मंदिरांचा समावेश आहे. या मंदिरापैकी बीड, राजापूर, औरंगाबाद येथील तीन मंदिरांचा पहिल्या टप्प्यात दुरूस्ती होणार आहे. त्यासाठी शासनाकडून अनुक्रमे या तीन मंदिराना 7,7, आणि 11.50 कोटींचा निधी रस्ते विकास महामंडळाकडे प्राप्त झाला आहे. तसेच या मंदिराचे काम करणाऱ्या संस्थांदेखील निविदानुसार अंतिम करण्यात आलेल्या आहेत.

याबाबत माहिती देताना रस्ते विकास महामंडळाचे अभियंता राहूल वसईकर म्हणाले,“ या तीनही मंदिराच्या दुरूस्तीच्या कामाची सुरुवात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.

 

 

Back to top button