वर्ध्यात शुक्रवारपासून ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : गांधी, विनोबांची भूमी साहित्यिक, रसिकांच्या स्वागताला सज्ज | पुढारी

वर्ध्यात शुक्रवारपासून ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन : गांधी, विनोबांची भूमी साहित्यिक, रसिकांच्या स्वागताला सज्ज

वर्धा : पुढारी वृत्तेसवा- विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्ध्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी ३ फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे. संमेलनादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य संमेलनस्थळाला महात्मा गांधी साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे.

वर्ध्यातील स्वावलंबी विद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. साहित्य संमेलनाकरिता विविध समित्या अहोरात्र झटत आहे. प्रशासन, विविध सामाजिक संघटना, राजकीय मंडळी, सर्वसामान्य व्यक्तीदेखील यामध्ये सहभाग नोंदवत आहेत. संमेलनस्थळी वेगवेगळे सहा सभामंडपे तयार करण्यात आले आहेत. त्यास वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. ग्रंथप्रदर्शनाला पुस्तकाच्या आकाराचे प्रवेशद्वार निर्माण करण्यात आले आहे. संमेलनाच्या प्रवेशद्वारावर गांधीजींचे चरख्यावर सूतकताई करतानाचे कटआऊट आकर्षक ठरत आहे. येथे सुमारे ३०० ग्रंथदालने असणार आहेत. ३० स्वतंत्र स्टॉल्स आहेत.

महात्मा गांधी साहित्य नगरीत प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर सकाळी १०.३० वाजता उद्घाटन समारंभ आयोजित आहे. संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, पूर्वाध्यक्ष भारत ससाणे यावेळी उपस्थित राहतील. उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. यावेळी स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास, विशेष अतिथी आमदार डॉ. विश्वजीत कदम, डॉ.पी.डी. पाटील, डॉ. डी.वाय. पाटील उपस्थित राहतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर करतील तर डॉ. उज्ज्वला मेहंदळे आभार मानतील.

शुक्रवारी सकाळी आठ वाजता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडीला सुरूवात होणार आहे. ग्रंथदिंडीमध्ये विविध शाळा, विद्यार्थी सहभागी होतील. ग्रंथदिंडीदरम्यान वर्ध्यातील विविध महत्त्वाच्या स्थानांच्या झाँकी राहणार आहेत. यावेळी शासनाच्या विविध विभागांच्याही झाँकी राहतील. साहित्य संमेलनाकरिता वर्धा नगरी सज्ज झाली आहे.

 

Back to top button