पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेम आणि इच्छाशक्ती अफाट असली की कोणतीही परीक्षा देणं अवघड नसतं. नेमकं हेच सिद्ध करून दाखवलं आहे सुरेश आणि मेघना चासकर या नवदाम्पत्याने. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवा परीक्षा ही दोघेही एकाचवेळी उत्तीर्ण झाले आहेत. नुकत्याच लागलेल्या निकालात या दोघांचंही नाव झळकलं. नोकरी, घर, नवीन संसार या सगळ्या आघाड्या सांभाळत या दोघांनीही यश संपादन केलं आहे.
२०२२ मध्ये सुरेश आणि मेघना लग्नाच्या बेडीत अडकले. यादरम्यान एक वर्षाच्या आतच ही हटके गोड बातमी त्यांना मिळाली. मेघना यांचे मुळगाव कोपरगाव तालुक्यातील येसगाव आहे. तर सुरेश हे सिन्नर तालुक्यातील सायाळ्याचे रहिवासी आहेत. इंजिनिअरिंगला असल्यापासूनच या दोघांनीही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. पण क्लासवन अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगत दोघांनीही लग्नानंतरही परीक्षेचा अभ्यास सातत्याने सुरू ठेवला होता. पती-पत्नी एकाचवेळी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.