मुंबईनंतर पुण्याला करणार भारताची औद्योगिक राजधानी : केंद्रीय मंत्री नारायण राणे | पुढारी

मुंबईनंतर पुण्याला करणार भारताची औद्योगिक राजधानी : केंद्रीय मंत्री नारायण राणे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मुंबईही भारताची आर्थिक राजधानी असून, त्या पाठोपाठ पुणे शहर देखील भारताची आर्थिक व औद्योगिक राजधानी म्हणून नावरुपास आणण्याची तयारी जी २० च्या माध्यमातून भारत सरकार करीत असल्याचे मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी पुण्यात व्यक्त केले. पुण्यातील सेनापती बापट रोडवरील हॉटेल मेरियट मध्ये जी २० परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जी २० सह राजकीय प्रश्नांना आपल्या शैलीत उत्तरे दिली.

राणे म्हणाले, या परिषदेचे उद्घाटन करण्याचे भाग्य मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे लाभले, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. या परिषतेतून राज्याला काय फायदा होणार? या प्रश्नावर ते म्हणाले की, या परिषदेचे चांगले दूरगामी परिणाम पाहायला मिळतील. २० देशातून आलेले प्रतिनिधी भारताविषयी जगात चांगल्या गोष्टी सांगून तेथील उद्योजकांना इथे गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करतील.

अमेरिका ३० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे. त्यापाठोपाठ चीन, जर्मनी व जपान यांचा नंबर लागतो. या देशांच्या बरोबरीने भारत जात आहे. २०१४ साली भारत दहाव्या क्रमांकावर होता. आजरोजी भारत ५ व्या क्रमांकावर आहे. २०३० पर्यंत भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून नावरुपास येईल.

औद्योगिक गुंतवणूक येणार….
या परिषदेत काही सामंजस्य करार होणार आहेत का? या प्रश्नाच्या उत्तरात राणे म्हणाले, असे करार प्रत्यक्ष होणार नसलेतरी पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, शहरीकरण, पर्यावरण हे महत्त्वाचे मुद्दे या परिषदेत चर्चिले जाणार आहेत त्यातूनच उद्योगाची पायाभरणी होण्यास मदत होईल. भारत सरकार त्यादिशेने तयारी करत असून जास्तीत जास्त रोजगार कसे उभे राहतील याचा विचार करीत आहे.

पुणे भारताचे औद्योगिक हब….

या परिषदेचा पुण्याला काय फायदा? या प्रश्नावर ते म्हणाले, पुणे भारताचे औद्योगिक हब असून इथे पायाभूत सुविधा जास्त आहेत. हे बघूनच विदेशी गुंतवणूकदार पुण्यात यायला तयार होतील असेही त्यांनी सांगितले.

म्हणून महाराष्ट्रातील जमिनी महाग….
सरकार बदलले की, औद्योगिक धोरण बदलतात आणि येथे येणारे प्रकल्प दुसऱ्या राज्यात जातात? या प्रश्नावर ते म्हणाले की, विदेशी गुंतवणूकदार हे ज्या राज्यात चांगल्या पायाभूत सुविधा आहेत, त्याचबरोबर कर, सवलतीच्या योजना पाहूनच गुंतवणूक करतात. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पायाभूत सुविधा चांगल्या असल्याने येथील जमिनीचे दर महाग आहेत. त्यामुळे काही उद्योग इतर राज्यात गेले. याचा अर्थ महाराष्ट्र मागे पडला असे होत नाही.

कमळ भारताचे
जी २० च्या लोगोत असलेले कमळ हे भाजपचे की भारताचे? या प्रश्नावर राणे यांनी त्यांच्या शैलीत उत्तरे दिली. ते म्हणाले, तुम्ही काहीही विचार करू शकता. मी माझ्या नजरेने ते कमळ भारताचेच आहे असे समजतो. कमळ हे शाश्वत विकासाचे प्रतिक असल्याने ते भारताचेच असे प्रत्येकाला वाटते.

मंदी रोखण्याचा प्रयत्न….
आंतरराष्ट्रीय नाण्याच्या अहवालानुसार जगात पुन्हा एकदा मंदीची लाट येणार आहे? यावर भारताचे प्रयत्न या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, भारतात जून नंतर मंदीची लाट येण्याची शक्यता वाटते. मात्र केंद्र सरकार त्यावर खास उपाययोजना करीत असून सूक्ष्म लघु उद्योग यांना बळकटी देत ती थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल. देशात ६ कोटी सूक्ष्म लघुउद्योग आहेत. त्यांना रोजगारासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न मंदीच्या काळात केला जाणार आहे.

Back to top button