लम्पीची लस नोव्हेंबरमध्ये पुण्यात; केंद्रीय संस्थांनी विकसित केलेली लस महाराष्ट्राला हस्तांतरित | पुढारी

लम्पीची लस नोव्हेंबरमध्ये पुण्यात; केंद्रीय संस्थांनी विकसित केलेली लस महाराष्ट्राला हस्तांतरित

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने तयार केलेले लम्पी त्वचारोग लस तंत्रज्ञान सर्वप्रथम पुण्यातील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था (आयव्हीबीपी) या अद्ययावत असलेल्या राज्य सरकारच्या संस्थेकडे नुकतेच कराराद्वारे हस्तांतरित करण्यात आले आहे. ‘लम्पी प्रोव्हॅक’ या लशीचे दहा वर्षे व्यावसायिक उत्पादन घेण्यासाठीचे अधिकार राज्याला मिळाले आहेत. त्यानुसार लम्पी त्वचारोग प्रतिबंधक लशीचे उत्पादन नोव्हेंबर महिनाअखेर पुण्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे.

लम्पी लस तंत्रज्ञान हरियानामधील हिसार येथील राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र आणि उत्तर प्रदेशातील बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) दोन संस्थांनी संयुक्तपणे विकसित केले आहे. देशात सर्वप्रथम महाराष्ट्राला हे तंत्रज्ञान देण्यात आले आहे.

याबाबत पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे म्हणाले, ‘देशात लम्पी रोगाच्या प्रतिबंधासाठी सद्यस्थितीत जनावरांना गोट पॉक्स रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात येते. मूळ गोट पॉक्स रोगासाठीच्या लसीकरणासाठी तयार केलेली ही लस आपण मोठ्या जनावरांत लम्पी त्वचारोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी वापरत आहोत.

मात्र, त्यामुळे लम्पी त्वचारोग प्रतिकारकशक्ती शंभर टक्के तयार होत नाही. आता केंद्राने लम्पी प्रोव्हॅक ही लस महाराष्ट्राला दिलेली आहे. त्यानुसार येथील आयव्हीबीपी संस्थेतील अधिकार्‍यांचा एक गट हिसार येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे. त्यानंतर लम्पी त्वचारोग लशीचे बीज महाराष्ट्राला दिले जाईल. त्याच्या प्राथमिक चाचण्या राज्यात घेतल्या जातील. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेऊनच गोधनास लम्पी प्रतिबंधक लस उपलब्ध होईल.

Back to top button