विदर्भ, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता; 46 तासांत थंडीचा कडाका वाढणार

विदर्भ, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता; 46 तासांत थंडीचा कडाका वाढणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेशपासून उत्तर-मध्य महाराष्ट्र भागापर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. या परिणामामुळे येत्या 24 तासांत विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, या पावसाची तीव्रता कमी झाल्यावर थंडीचा कडाका वाढेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
उत्तर भारतात गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र दाट धुके तसेच थंडीची लाट आहे.

त्यामुळे राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, उत्तराखंड, हरियाणा या भागांत थंडी आणि दाट धुके पसरले आहे. 7 ते 9 जानेवारीदरम्यान हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवाताची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे उत्तर भारतातील सर्वच राज्यांत थंडीच्या लाटेबरोबरच दाट धुक्यांमध्ये वाढ होणार आहे. या स्थितीमुळे उत्तर भारतातून राज्याकडे तीव्र थंड वारे वाहणार आहेत. त्यामुळे राज्यात देखील 24 तासांत थंडीचा कडाका वाढणार आहे. सध्या राज्यात किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी वाढ आहे. मात्र, उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागल्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन थंडी वाढणार आहे.

दरम्यान, द्रोणीय स्थितीमुळे दक्षिण-पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र म्हणजेच मुंबईसह कोकण वगळता खान्देश, नाशिक, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रातही किमान तापमान सरासरीपेक्षा काहीसे घसरलेले असून, थंडीचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात जाणवत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news