पुण्यासह 7 जिल्ह्यांत अधिकार्‍यांवर होणार कारवाई : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

पुण्यासह 7 जिल्ह्यांत अधिकार्‍यांवर होणार कारवाई : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील हडपसर येथे झालेल्या बेकायदा दस्तनोंदणीचे लोण राज्यभर पसरले आहे. याप्रकरणी पुण्यासह राज्यातील सात जिल्ह्यांतील संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधिमंडळात दिली. आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, माधुरी मिसाळ आणि सिद्धार्थ शिरोळे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना महसूलमंत्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, 'राज्यात गेल्या दोन वर्षांत तुकडेबंदी कायदा आणि स्थावर संपदा तथा मालमत्ता (विकास आणि नियमन) कायदा (रेरा) या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन होत आहे. तसेच सक्षम प्राधिकरणाच्या बोगस ना-हरकत प्रमाणपत्राच्या आधारे दहा हजार 635 मालमत्तांची बेकायदा दस्तनोंदणी केल्याची बाब आहे. शहरात तुकडेबंदी कायदा आणि रेरा या दोन्ही कायद्यांचे उल्लंघन करून दस्तनोंदणी करण्यात आल्याचे तपासणीनंतर निदर्शनास आले.

त्यानंतर पुणे शहरातील सर्व 27 दस्तनोंदणी कार्यालयांत नोंदविण्यात आलेल्या दस्तांची तपासणी करण्यासाठी तपासणी पथकाचे गठण राज्य शासनाकडून करण्यात आले होते. या तपासणी पथकाने केलेल्या तपासणीत तुकडेबंदी कायदा आणि रेरा या दोन्ही कायद्यांतील तरतुदींचे पालन न करता दहा हजार 561 दस्तांची नोंदणी झाल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, पुणे शहरातील सर्व 27 दस्तनोंदणी कार्यालयांच्या तपासणीत बेकायदा दस्तनोंदणी केलेल्या दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर निलंबन, बदली, विभागीय चौकशी, समज अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे, असेही महसूलमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

बेकायदा दस्तनोंदणी राज्यभर
पुण्यासह ठाणे, नाशिक (सिन्नर, बागलाण, निफाड), औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी अशा सात जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची बेकायदा दस्तनोंदणी, गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येत आहे, असेही महसूलमंत्री विखे पाटील यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news