पुढारी ऑनलाईन: साहित्य अकादमीने गुरुवारी साहित्य अकादमी पुरस्कार 2022 जाहीर केले. पुण्यातील लेखक प्रमोद मुजूमदार यांना सलोख्याचे प्रदेश –शोध सहिष्णू भारताचा, या वरिष्ठ पत्रकार सबा नक्वी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बद्री नारायण यांना हिंदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जाणार आहे. बद्री नारायण हे फार प्रसिद्ध हिंदी कवी आहेत. हिंदी कवितेतील विशेष योगदानाबद्दल त्यांना केदार सन्मानानेही गौरविण्यात आले आहे.
याशिवाय इंग्रजीसाठी अनुराधा रॉय आणि उर्दूसाठी अनीस अश्फाक यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अकादमीचे सचिव के. श्रीनिवास राव यांनी याबाबत माहिती दिली आहे. 23 भाषांसाठी जाहीर झालेल्या या पुरस्कारांमध्ये सात काव्यसंग्रह, सहा कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, दोन साहित्यिक समीक्षा, तीन नाटके आणि एक आत्मचरित्र यांचा समावेश आहे. तसेच कोकणी, हिंदी, बंगाली, ओडिया, संताली आणि मैथिली या भाषेचे अनुवाद पुरस्कार नंतर जाहीर केले जाणार आहेत
साहित्य अकादमी पुरस्कार हा एक साहित्यिक सन्मान आहे, जो साहित्य अकादमी दरवर्षी एखाद्या साहित्यिकच्या कार्याला प्रदान केला जातो. भारतीय संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या 22 भारतीय भाषांव्यतिरिक्त, राजस्थानी आणि इंग्रजी भाषेसह एकूण 24 भाषांमध्ये ते प्रदान केले जातात. साहित्य अकादमी पुरस्कार पहिल्यांदा 1955 मध्ये देण्यात आले.
साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये विजेत्यांना प्रत्येकी १ लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह व शाल दिले जाते. सुरुवातीच्या काळात पुरस्काराची रक्कम 5,000 रुपये होती, 1983 मध्ये 10,000 रुपये आणि 1988 मध्ये ती वाढवून 25,000 रुपये करण्यात आली. त्यानंतर सन 2001 मध्ये ही रक्कम वाढवून 40 हजार रुपये करण्यात आली. त्यानंतर 2003 मध्ये रक्कम 50 हजार रुपये करण्यात आली. 2009 मध्ये या पुरस्काराची रक्कम 50 हजारांवरून 1 लाख रुपये करण्यात आली आहे.