सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून विसर्जन तयारीची पाहणी | पुढारी

सातारा : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून विसर्जन तयारीची पाहणी

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड नगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह परिसरात करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.

प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत नगरपालिकेने उभारलेले जलकुंभात गणेश मूर्ती विसर्जित करत सहकार्य करणाऱ्या कराडकर नागरिकांचे ना. देसाई यांनी आभार मानले आहेत.

रविवारी दुपारी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड शहरातील गणेश विसर्जन व्यवस्था पाहण्यासाठी शहरात विविध ठिकाणी भेट दिली. कराड शहरवासियांनी प्रशासनाला केलेल्या सहकार्याबद्दल नागरिकांचे त्यांनी आभार मानले.

शहरातील विविध ठिकाणी उभारलेले जलकुंभ तसेच निर्माल्य गोळा करण्यासह गणेश मूर्ती एकत्रित करण्यासाठी केलेल्या फिरत्या संकलन केंद्रांची माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी केली.

तसेच कृष्णा घाटावर जाऊन ना. देसाई यांनी पालिकेकडून केल्या जाणाऱ्या गणेश मूर्तीच्या विसर्जनाची पाहणी करत आरतीही केली.

यावेळी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके, शिवाजी पवार, जयंत बेडेकर, अख्तर आंबेकरी उपस्थित होते.

Back to top button