भिलवडी : पुढारी वृत्तसेवा
धनगाव (ता. पलूस) हद्दीत घरगुती वादातून पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. कांताबाई गणपत पवार (वय 45, मूळ रा. सडोली, ता. मावळ, जि. पुणे, सध्या रा. धनगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत नवनाथ गोवर्धन राठोड यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी महिलेचा पती गणपत पवार (वय 50) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. घटनेनंतर पवार हा फरार झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित गणपत पवार हा पत्नी कांताबाईसह धनगाव- बुरूंगवाडी दरम्यान असणार्या सदाशिव चव्हाण यांच्या पडीक शेतात वास्तव्यास आहे. ते लाकूडतोड करून कोळसा बनविण्याचे काम करीत होते. शुक्रवारी हे दोघे पती-पत्नी बुरुंगवाडी येथे बाजार करण्यासाठी गेले होते. बाजार करून रात्री उशिरा ते परतले. या पती-पत्नीत रात्री वाद झाल्याने संशयित गणपत याने पत्नी कांताबाई हिला लाकडाने मारहाण केली. यामध्ये कांताबाईचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित पवार याने तिथून पलायन केले. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आसपासच्या गावातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान, त्यांना संशयित गणपत पवार हा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाल्याचे आढळून आले.