सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी साविआचे नेते खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि नविआचे नेते आ. शिवेेंद्रराजे भोसले हे दोघेही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. सत्ताधारी सातारा विकास आघाडी व विरोधी नगरविकास आघाडीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राजे गटांमध्ये फोडाफोड करून चाचपणीला प्रारंभ झाला आहे.
सातारा नगरपालिकेच्या नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सातारा विकास आघाडीला एकहाती सत्ता मिळाली. साविआच्या 22 जागा व नगराध्यक्ष निवडून आले. नविआला 12 जागांवर समाधान मानावे लागले. याच निवडणुकीत भाजपनेही 6 जागांवर विजय मिळवला. पहिल्यांदाच दोन्ही राजेंव्यतिरिक्त एका पक्षाच्या इतक्या जागा निवडून आल्या होत्या. याच निवडणुकीत सौ. वेदांतिकाराजे भोसले यांना पराभव पत्करावा लागला. ही हार नविआच्या प्रचंड जिव्हारी लागली. विशेषत: आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी हा पराभव कायम भळभळती जखम राहिला आहे. त्यातूनच साविआ-नविआमध्ये गेल्या साडेचार वर्षांत कायम सुंदोपसुंदी राहिली. तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या खा. उदयनराजेंपासून फारकत घेण्यासाठी आ.शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादी सोडली. नगरपालिकेच्या गत निवडणुकीपासून उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्यामध्ये कधीच पॅचअप झाले नाही. कायम दोघांमध्ये टोकाचे मतभेद राहिले. तिखट पत्रकबाजी गेल्या साडेचार वर्षात दोन्ही बाजूने होत आहे.
दोन्ही राजांमध्ये मेडिकल कॉलेज, सातारा हद्दवाढ, कास धरण उंची वाढवणे, ग्रेड सेपरेटर अशा प्रकल्पांवरुन कायम श्रेयवाद उफाळला. कधी सभागृहात गोंधळ तर कधी निवेदने-पत्रकबाजीतून देवून आरोप-प्रत्यारोप झाले. गेल्या पाच वर्षांत दोन्ही आघाड्यांनी नगरपालिकेत आपापल्यापरीने काम केले.आता मात्र दोन्ही राजे मैदानात उतरले आहेत.
आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी हद्दवाढ भागात लक्ष घातले आहे. शाहुपूरी, तामजाईनगर, विलासपूर, शाहूनगर आदि भागात त्यांची विविध विकासकामांची भूमिपूजने घेतली आहेत. प्रभागांमध्ये पूर्ण झालेल्या कामांची उद्घाटनेही लवकरच घेतली जाणार आहेत. या कार्यक्रमांदरम्यान मात्र आ. शिवेंद्रराजे भोसले आक्रमक मूडमध्ये दिसत आहेत. वर्ष लोटून गेले तरी हद्दवाढ भागाकडे दुर्लक्ष का, सत्ता असूनही विकासकामे का झाली नाहीत, अशापध्दतीने आ. शिवेंद्रराजे भोसले सत्ताधार्यांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत.
सत्ताधार्यांना ते उघड-उघड आव्हान देत ललकारत आहेत. तर त्यांच्या भाषणातून कधी टोलेबाजीही दिसत आहे. मात्र विरोधकांच्या टीकेला विकासकामाने उत्तर देण्याची खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची ही रणनिती दिसत आहे. खा. उदयनराजे भोसले यांची आक्रमकता सर्वांनाच माहिती आहे. सातारा हद्दवाढ भागात 5 ठिकाणी नुकत्याच झालेल्या स्ट्रीटलाईट कामांच्या लोकार्पण सोहळ्याच्यानिमित्ताने खा. उदयनराजेही मैदानात उतरल्याचे चित्र पहायला मिळाले. आम्ही वचन देत नाही तर दिलेला शब्द पाळतो, असा डायलॉग मारत खा. उदयनराजेंनी आ. शिवेंद्रराजेंना टोला दिला. साविआनेही हद्दवाढ भागावर फोकस केला आहे. त्याठिकाणी कोट्यवधींची विकासकामे मंजूर केली आहेत. या कामांना निधीही उपलब्ध झाला आहे. कधीही निवडणूक जाहीर झाली तरी सामना करण्याची तयारी साविआने केली आहे. त्यांनी केलेले मायक्रो प्लॅनिंग विरोधकांना ऐनवेळी चकीत करुन सोडणारे असेल, अशी शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केल्याचा दावा, साविआने केला आहे तर साडेचार वर्षाच्या कारभारावर नविआ बोट ठेवत आहे. पत्रकबाजीतून आ. शिवेंद्रराजे सातारा विकास आघाडीला टोले लगावत आहेत. प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा काहीजण अंदाज घेत प्रभागात काम करत आहेत. काही नगरसेवकांनी नगरपालिकेत न येता प्रभागातील कामांकडे लक्ष दिले आहे. सत्ता टिकवणे हे साविआसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. तर वचक राहण्यासाठी नविआला बाजी लावावी लागणार आहे.
सातारा पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसही उतरणार, असा पक्षाकडून दावा केला जात आहे. सातारा पालिका निवडणुकीत पॅनेल उभारणार असल्याचे आ. शशिकांत शिंदे, दीपक पवार यांनी अनेकदा सांगितले आहे. दोन्ही राजे गटात फोडाफोडी करून किंवा दोन्ही राजेंवर नाराज असलेले आणि बाजूला जावू इच्छिणारे यांच्यावर लक्ष केंद्रित करून राष्ट्रवादी पॅनलची चाचपणी करू लागली आहे. शिवसेनेही या निवडणुकीत रस दाखवला असून काही पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दोन आघाड्या आणि पक्षांची समीकरणे कशी जुळतात याची उत्सुकता सातारकरांसह जिल्ह्याला लागून राहिली आहे.
भाजप गड राखणार का?
गत पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही राजे राष्ट्रवादीमध्ये होते. तरीही आघाड्यांच्या माध्यमातून एकमेकांविरोधात लढले. दोघांच्या विरोधात जाऊन भाजपने सहा जागा जिंकल्या होत्या. आता दोघेही भाजपमध्ये आहेत. त्यामुळे मूळच्या भाजपमध्ये निवडणूक कशी लढवायची, हा पेच आहे. चंद्रकांतदादांनी भलेही दोन्ही राजेंचे मिटवायला आम्ही समर्थ आहोत, असे म्हटले असले तरी दोन्ही राजेंचे सातारा नगरपालिकेच्या बाबतीत सध्या तरी मिटू शकत नाहीत. दोन्ही राजे भाजपमध्ये आले तरी नगरपालिकेतील सत्ता समीकरणे बदलली नाहीत. मूळ भाजप तिथेही विरोधकांच्याच भूमिकेत आहे. आता बदलत्या परिस्थितीत भाजप पॅनल कसे करणार? उमेदवारी कोणाला देणार? याविषयी उत्सुकता आहे.