मोठे साहेब ठाण्यात नाहीत, नंतर या …..! नागरिकांना ताटकळत ठेवणे पोलिसांना पडेल महागात | पुढारी

मोठे साहेब ठाण्यात नाहीत, नंतर या .....! नागरिकांना ताटकळत ठेवणे पोलिसांना पडेल महागात

संतोष शिंदे

पिंपरी : मोठेसाहेब बाहेर गेले आहेत, थोडावेळ थांबा… किंवा नंतर या. पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारदारांच्या कानावर सर्रास पडणारे हे वाक्य.. मात्र, पोलिसांच्या या कारभारामुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होतो. तसेच, पोलिस दलाविषयी नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण होतात. याची गंभीर दखल घेत महासंचालक कार्यालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये सर्व घटकप्रमुखांना नागरिकांची तत्काळ दखल व समाधान करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागरिक तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात जातात. त्या वेळी प्रभारी अधिकारी गस्त किंवा इतर शासकीय कामासाठी बाहेर असतात. त्यामुळे ठाणे अंमलदार तक्रारदार यांना प्रभारी अधिकारी येण्याची वाट पाहण्याचा सल्ला देतात. यामध्ये तक्रारदार नागरिकांचा वेळ वाया जातो. तसेच, पोलिस आपल्याला सन्मानाची वागणूक देत नाहीत, असा समज नागरिकांचा होतो. या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सर्व घटक प्रमुखांसाठी एक परिपत्रक काढण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्यांचे समाधान करण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले आहेत. ज्या वेळी नागरिक पोलिस ठाण्यात लेखी, तोंडी तक्रार घेऊन येतात, तेव्हा संबंधित प्रभारी अधिकारी पोलिस ठाण्यात उपस्थित नसल्यास त्यांच्यापेक्षा कनिष्ठ पोलिस अधिकारी किंवा ठाणे अंमलदार यांनी तक्रार स्वीकारावी; तसेच नागरिकांना तक्रार स्वीकारल्याची पोहोच द्यावी. शक्य असल्यास वेळीच तक्रारींचे निरसन करावे. महिला किंवा ज्येष्ठ नागरिक तक्रार देण्यासाठी आल्यास प्राधान्याने त्यांची तक्रार नोंदवून घ्यावी.

याबाबत पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी तक्रारींचा नियमित आढावा घ्यावा. नागरिकांच्या तक्रारींची योग्य निराकरण होत आहे की नाही, याबाबत त्यांनी खातरजमा करावी. आयुक्तालयातील उच्च पदस्थ अधिकार्‍यांनी पोलिस ठाण्यांना अचानक भेटी देऊन तेथील नागरिकांना योग्य प्रतिसाद मिळत आहे की नाही, याबाबत तपासणी करावी, असे या परिपत्रकात नमूद आहे. एकंदरीतच महासंचालक कार्यालयाकडून पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांचे समाधान होईल, याबाबत दक्षता घेण्यासाठी घटक प्रमुखांना सूचित करण्यात आले आहे.

स्थानिक पोलिसांनी दखल न घेतल्यास थेट व्हॉट्सअ‍ॅप करा, असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले आहे. या बाबत सर्व पोलिस ठाण्यात मोबाईल क्रमांकांचे फलकदेखील लावण्यात आले आहेत. नुकतेच महासंचालक कार्यालयाकडून आलेल्या परिपत्रकानुसार प्रभारी अधिकार्‍यांना पुन्हा एकदा सूचित करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे.
– अंकुश शिंदे,पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

Back to top button