पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जमावबंदी : शहरात कलम 144 नुसार गणेशोत्सव कालावधीत संचाबंदी लागू असल्याचे काही संदेश समाजमध्यमांवर फिरत आहेत. मात्र शहरात कोणत्याही प्रकारचे नव्याने आदेश लागू करण्यात आले नसल्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जो आदेश लागू करण्यात आला आहे तो आदेश 1973 च्या कलम 144 नुसार लागू करण्यात आला असून, उत्सव कालावधीत कोणत्याही रस्त्यात अथवा सार्वजनिक ठिकाणी, मंडळासमोर ज्वालाग्रही (राकेल, डिझेल, गॅस, पेट्रोल) पदार्थाच्या साह्याने आगीचे लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. 10 ते 19 सप्टेंबर पर्यंत हे आदेश लागू राहणार आहे.
दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने निर्धारीत केलेल्या नियमावलीनुसार आदेश लागू करण्यात आले आहेत. कलम 144 नुसार ज्वालाग्रही पदार्थाच्या बाबतीत लागू केलेल्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून शहरात पुर्णताः उत्सव कालावधीत संचारबंदीचा लागू असल्याचे संदेश फिरत आहेत. मात्र वेगळे कोणते निर्बंध पुण्यात लागू नाहीत.
गणेश मंडळांनी तयार केलेल्या आचारसंहितेनुसार उत्सव साजरा करण्यास तयारी दर्शवलेली आहे. यावेळी श्री च्या दर्शनाची सोय ऑनलाईन पद्धतीने उपल्बध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर बाहेर येण्याचे कारण नाही. तसेच यंदा विसर्जन मिरवणूकांवर देखील बंदी आहे. त्यामुळे सर्व मंडळांनी समाजिक जबाबदारी जपत पोलिसांना सहकार्य करण्याचे ठरवलिले आहे. त्यामुले नागरिकांनी देखील नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिस सह आयुक्त डॉ. शिसवे यांनी केले आहे.