फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणू हे म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाला फुगा देऊन समजूत काढण्यासारखं; शरद पवारांची टीका | पुढारी

फॉक्सकॉनपेक्षा मोठा प्रकल्प आणू हे म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाला फुगा देऊन समजूत काढण्यासारखं; शरद पवारांची टीका

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रासह इतर राज्यातील मोठे प्रकल्प गुजरात मध्ये पळवण्यात आलेले आहेत. वेदांता सारखा मोठ्या प्रकल्पासाठी तळेगाव येथीलच जागा योग्य होती. मात्र हा प्रकल्प गुजरातला पळवल्यावर केंद्र सरकार महाराष्ट्राला दुसरं अन्य प्रकल्प देण्याची भाषा करत आहे. केंद्राचा हा प्रकार म्हणजे लहान मुलास फुगा देऊन समजूत काढण्यासारखा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.

पुण्यात गुरुवारी (दि.१५) पत्रकारांशी संवाद साधताना पवार पुढे म्हणाले, वेदांता आणि फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याच्या कारणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपाच्या फेरी झाडल्या जात आहे. यावर काहीतरी नवीन देण्याची भाषा करून विषयास कलाटणी दिली जात आहे. महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प एकदाचा गेला ना.. आता चर्चा करून काय उपयोग. प्रत्यक्षात हा प्रकल्प बाहेर जायला नको होता. उद्धव सरकारवर खापर फोडणारे मुख्यमंत्री शिंदे आणि मंत्री उदय सामंत हे दोघेही महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. आता नाव ठेवणे हे शहाणपणाचे वर्तन वाटत नाही.

वेदांताचे हे नवीन नाही…

वेदांता ग्रुपने हे पहिल्यांदाच केले असे नाही. त्यांनी यापूर्वी रत्नागिरीमध्ये देखील प्रकल्प टाकण्याचे जाहीर करून नंतर तो प्रोजेक्ट चेन्नईला नेला होता. गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे राज्य पहिल्या पसंतीचे होते. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र ऐवजी इतर राज्यांना पसंती देण्याचे काम गुंतवणूकदार करत आहे. हे वातावरण कशाप्रकारे बदलू शकतो यासाठी शिंदे सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मी मंत्री असताना दररोज दोन तास गुंतवणूकदारांसाठी वेळ काढून बसायचो. महाराष्ट्रात कुठले मोठे प्रोजेक्ट येऊ शकतात आणि त्यासाठी त्यांना काय हवंय, काय वातावरण पाहिजे, काय सवलती पाहिजे यावर उद्योजकांशी चर्चा करून तातडीने निर्णय घेत होतो.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरात प्रतिसाद मिळत आहे. असे असताना केवळ टीका करायची म्हणून त्यांच्या नावावरून टिंगल टवाळी करणे, बरं वाईट बोलणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण नाही. तुम्ही धोरणावर टीका करा, त्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका करा पण त्यांच्या नावावरून खिल्ली उडवणे म्हणजे पोरकटपणा आहे असे मला वाटते.

मोदींचे सर्वाधिक दौरे कुठे.,…

मोदी, शहा यांचे सरकार केंद्रात असल्याने त्याचा फायदा गुजरात राज्याला होत आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर सर्वाधिक दौरे केले असतील ते गुजरातमध्येच. यावरून त्या राज्यात आपोआप गुंतवणुकदारांचा ओघही वाढला. नरेंद्र मोदींनी वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी मदत केली तर आम्ही त्यांच्या भूमिकेचे स्वागतच करू. पण आजच्या परिस्थितीवरून हा प्रकल्प महाराष्ट्रात येणे शक्य वाटत नाही.

बारामती बद्दल.. त्यांचा अधिकार…

केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. ‘ साधन, संपत्ती व सत्ता ‘ यांचा वापर करून इतर राज्यातील सरकारे अस्थीर करायची असं सध्या काम सुरू असून केंद्राने हा नवीन कार्यक्रम हाती घेतल्याचे दिसते. बारामती बरोबर पुणे व शिरूर लोकसभा मतदारसंघ ताब्यात घेण्याचे भाजपकडून सुरू असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले, आधी लोकांना वाचा मग समजेल. त्यांचे विचार समजले की, हाती काय पडेल याचा अंदाज येईल. २०२४ लोकसभा निवडणुकीबाबत भाजप विरोधात मोट बांधण्याबाबत अद्याप विचार झाला नाही. शिवाय राज्यातील निवडणुकीबाबतही निर्णय घेण्यात आला नाही.

मंत्र्यांचे पदभार नाही…नवीनच!

शिंदे – फडणवीस सरकारच्या कार्यशैलीवर केलेल्या प्रश्नाच्या उतरात पवार म्हणाले, मंत्री पदाची शपथ घेऊन २ महिने लोटले तरी अनेकांनी पदभार स्वीकारला नाही हे नवीनच वाटतं. वास्तविक पाहता त्याच दिवशी चार्ज घेणे गरजेचे असते. सध्या शिंदे यांनी ४०-४५ आमदारांना खुश ठेवण्याचे व उत्सवावर लक्ष केंद्रितचे धोरण अवलंबिले आहे.

वारकरी संप्रदाय बैठक…

वारकरी संप्रदाय सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी काम करत असतो. मात्र या संप्रदायात अस्वस्थता असल्याने त्यांनी चर्चा करण्याची तयारी दाखवली. मी देखील त्यांच्या भेटीसाठी उत्सुक होतो. त्यानुसार झालेल्या बैठकीत अनेकांनी चिंता व्यक्त केली की, मोदींच्या देहू दौऱ्यानंतर समन्वयाचा संदेश बाजूला जातोय असे दिसते.

मी सर्व पदाचे राजीनामे दिले…

सध्या मी ८२ वर्षाचा झालो असल्याने मी सर्वच पदाचे राजीनामे दिलेले आहे. कोणत्याच खेळाचा पदाधिकारी नसलो तरी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा सदस्य आहे. काल सहज गेलो तेंव्हा लोकांनी गराडा घातला अन् साहेब काहीतरी करा असे आवाहन केले गेले. माझ्या भेटीने दिल्लीला काय उत्तर द्यायचे याची चिंता अनेकांना पडली होती असाही टोला पवार यांनी लगावला.

गुंडाचा त्रास उद्योगांना….

चाकण, तळेगाव सारख्या पुण्यालगतच्या उद्योगनगरीत स्थानिक गुंडांचा त्रास वाढला असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दाखल घेत मी बैठक देखील घेतली होती. उद्योग क्षेत्रात असेच वातावरण राहिले तर गुंतवणूकदार कशी येईल, यावर देखील विचार करणे गरजेचे आहे. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही पवार यांनी म्हटलं आहे.

Back to top button