आता महाराष्ट्रातील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या एक लाखांपर्यंतच्या ठेवींना मिळणार संरक्षण | पुढारी

आता महाराष्ट्रातील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या एक लाखांपर्यंतच्या ठेवींना मिळणार संरक्षण

कोपरगाव: अहमदनगर जिल्हा स्थैर्यनिधी सहकारी संघ ज्याप्रमाणे लिक़्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाच्या आधारे पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देते त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या हमीद्वारे संरक्षण देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी दिली. या बोलताना कोयटे म्हणाले कि, ‘भारतातील नागरी सहकारी बँकेची ज्याप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हि शिखर बँक आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातील नागरी सहकारी पतसंस्थांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक समजली जाते. त्यामुळे या ठेव संरक्षणाला अधिकृत दर्जा प्राप्त होणार आहे. तसेच सध्या ठेव संरक्षणाची रक्कम ही १ लाख रुपयांपर्यंत आहे, ती टप्प्या टप्प्याने वाढत जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्राचे सहकार मंत्री अतुल सावे तसेच केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड, मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचेसह माजी अर्थ राज्यमंत्री आनंदराव आडसूळ हे उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देतांना महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव आणि महासचिव डॉ.शांतीलाल शिंगी म्हणाले की, महाराष्ट्रात सहकारी पतसंस्थांचे मोठे जाळे आहे. तथापि सदर पतसंस्थांना बँकेचा बँकिंग परवाना नसल्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या ठेवीदारांना संरक्षण मिळत नाही. त्यामुळे अनेक ठेवीदार पतसंस्थांकडे ठेवी ठेवण्याबाबत संभ्रमावस्थेत असतात. परंतु आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना हमी दिल्याने पतसंस्थांची विश्वासार्ह्यता वाढण्यास व पर्यायाने पतसंस्थांच्या ठेवींमध्ये वाढ होण्यास मदत होईल.

Back to top button