डाॅ. प्रज्ञा सातव : “स्व. राजीवजींचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार” | पुढारी

डाॅ. प्रज्ञा सातव : "स्व. राजीवजींचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार"

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : स्व. राजीव सातव यांच्या निधनास तीन महिने उलटले आहेत. त्यांनी देशभरात काँग्रेसचे संघटन उभे केले होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली पोकळी भरून निघणे शक्य नसले तरी, त्यांच्या विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करणार असल्याचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या उपाध्यक्षा डाॅ. प्रज्ञा सातव यांनी सांगितले.

प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारणी गुरूवारी (दि.२६) रोजी जाहीर झाली. या कार्यकारणीत माजी खासदार काँग्रेसचे दिवंगत युवा नेते राजीव सातव यांच्या पत्नी डाॅ. प्रज्ञा सातव यांना प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

यानिमित्ताने प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांच्याशी निवडीसंदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, “पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे. ती पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहिल. स्व. राजीवजी यांचे देशभरात मोठे काम काम होते. त्यांनी हजारो कार्यकर्ते घडविले आहेत. राजीवजी सातव यांच्या तोडीचे काम मला करणे शक्य नसले तरी, माझ्या हिंगोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी मी काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.”

हिंगोलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पाठीशी कायम राहून त्यांना पाठबळ देण्याची माझी भूमिका राहणार आहे. स्व. राजीव सातव यांनी हिंगोलीसह मराठवाडा, महाराष्ट्राच्या विकासासाठी राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काम करणार आहे. काँग्रेसचे बळकटीकरण करण्यावर माझा भर राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी, नेते राहूल गांधी, प्रियंका गांधी,  के.सी. वेणुगोपाल, एच. के. पाटील, नाना पटोले, वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे संघटन वाढविण्यावर भर देण्याचा मनोदय डाॅ. प्रज्ञा सातव यांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना व्यक्‍त केला.

पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

Back to top button