नागपंचमी : शेतकऱ्याच्या जीवनातील नागपंचमीचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या अधिक | पुढारी

नागपंचमी : शेतकऱ्याच्या जीवनातील नागपंचमीचे काय आहे महत्त्व? जाणून घ्या अधिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : नागपंचमी हा श्रावण महिन्यातील पहिला सण. हा सण तसे पाहिले तर सर्वत्र साजरा होतो. मात्र, शेतक-यांचा या सणाशी जवळचा संबंध असतो. शेतकऱ्यांच्या जीवनात नागपंचमीचे महत्त्व हे अधिक असते. याला तसे पाहता शास्त्रीय, नैसर्गिक बरीच कारणे आहेत मात्र, धार्मिक पौराणिक कारणे बरीच सांगितली जातात. वेगवेगळ्या पौराणिक कथा देखील आहेत. तर अनेक दंत कथा आख्यायिका आहेत.

त्यापैकी सर्वांना माहित असलेली एक कथा अशी की, एक शेतकरी हा श्रावणात नागपंचमीच्या दिवशी शेत नांगरतो. त्या शेता नागाचे एक वारूळ असते. नागिनीने नुकतीच पिल्ले जन्माला घातलेली असतात. नागीन भक्ष्याच्या शोधात बाहेर जाते. त्यावेळी नांगराचा फाळ लागून ही पिल्ले मरतात. नागीन जेव्हा पुन्हा येते तेव्हा आपल्या पिल्लांना मेलेले पाहून तिला राग अनावर होतो. तिने शेतक-याचा बदला घेण्याचे ठरवले. शेतक-याच्या संपूर्ण वंशाचा नाश करण्यासाठी ती शेतक-याच्या घरात येऊन शेतकरी त्याची बायको आणि दोन्ही मुलांसह सर्वांना दंश करते. तिथे तिला माहीत पडते याची मुलगी दुस-या गावाला आहे. ती तिला मारण्यासाठी तिथे पोहोचते.

नागीन जेव्हा मुलीला मारण्यासाठी तिच्या घरी पोहोचते तेव्हा तिथे ती पाहते की ती मुलगी नागांची चित्रे पाटीवर काढून नऊ नागकुळांची पूजा अर्चा करीत आहे. दूध-लाह्यांचा नैवेद्य दाखवित आहे. त्यामुळे तिला गहीवरून येते. ही नागीन मानव वेशात येऊन तिला विचारते तू हे काय करत आहे. त्यावेळी ती उत्तरते आज नागपंचमी मी नागदेवतांची पूजा करत आहे. आता या नागिनीला खूप पश्चाताप होतो. ती तिला घडलेली हकीकत सांगते. यावर शेतक-याची मुलगी क्षमा मागते. नागीन तिच्या भक्ती भावाने प्रसन्न होते. ती तिला अमृत देते आणि ते अमृत तिच्या मृत आई वडील आणि भावाला द्यायला सांगते.

त्याप्रमाणे हे अमृत घेऊन शेतक-याची मुलगी तातडीने घराकडे धाव घेते. तिथे जाऊन ते अमृत पाजते. अमृताच्या प्रभावाने ते विष उतरते आणि त्याचे प्राण पुन्हा येते. आपल्या कुटुंबाला जिवंत पाहून तिला खूप आनंद होतो. ती वडिलांना समजावते. नागपंचमीचे व्रत कसे करावे ते सांगते. त्यानंतर शेतकरी त्या नागिनीची क्षमा मागतो आणि नागांची पूजा करतो.

….असे म्हणतात ही घटना गाव, पंचक्रोशीत वा-यासारखी पसरली. लोकांनी नागपंचमीची पूजा करायला सुरुवात केली. या दिवशी तव्यावर कोणताही पदार्थ भाजत नाहीत. तसेच तळलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. साधे शिजवलेले अन्न तसेच दूध लाह्या खाल्ल्या जातात.

हा झाला कथेचा भाग मात्र, याला नैसर्गिक कारणही आहे. नाग हा अन्न साखळीतील महत्वाचा घटक आहे. नाग ही जमीन चांगली करतो. तसेच उंदीर अन्नाची, पिकांची नासधूस करतात. त्यामुळे पिकांची नासधूस करणा-या प्राण्यांपासून नाग रक्षण करतो. तसेच जून ते सप्टेंबर या काळात अनेक प्रजातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. याशिवाय भक्ष्य लपवण्यासाठी साप मानवी वस्तीच्या आसपास आढळतात. त्यामुळे मानवी वस्ती जवळ धूडगूस घालणारी उंदरे, घुशी यांना साप खाऊन टाकतात. त्यामुळे शेतक-यांची मोठी मदत होते.

स्त्रियांचे सण : पूजा अर्चेचा श्रावण

नाग हा शेतक-याचा मित्र असतो. परिणामी नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, कालौघात विकसित झालेल्या काही अंधश्रद्धांमुळे या दिवशी अनेक चुकीचे प्रकार होतात. याबाबत आपण पुढच्या लेखमध्ये पाहूच… पण शेतक-यांनी आपल्याला मदत करणा-या या मित्रासाठी एक दिवस आनंदाने साजरा करावा… त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. तसेच पुढील काळात जपून नांगरणी करावी… असाच या कथेचा हेतू दिसतो…

Back to top button