सोपानकाकांच्या रथाला खांदा देत सर्जाने सोडला प्राण | पुढारी

सोपानकाकांच्या रथाला खांदा देत सर्जाने सोडला प्राण

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : संत सोपानकाका पालखी सोहळ्यातील रथाला जुंपणार्‍या सर्जा आणि राजा या बैलजोडीपैकी सर्जा या बैलाने आपला प्रवास निम्म्यावरच थांबवत आपले प्राण सोडले. गेल्या 10 वर्षांपासून सर्जा सोपानकाकांचा पालखीरथ ओढत आहे. मात्र, या वर्षी विठ्ठलाला भेटायची त्याची इच्छा अपूर्णच राहिली.

सोरटेवाडी (ता. बारामती) येथील केंजळे कुटुंबीयांना गेल्या 100 वर्षांपासून संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा रथ ओढणार्‍या बैलांचा मान असतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोरटेवाडीच्या केंजळेवाड्यातून प्रसाद केंजळे, विकास केंजळे, नितीन कुलकर्णी, ज्ञानेश्वर केंजळे यांनी बैलांचे पूजन करून सर्जा आणि राज्याला सासवडला पाठविण्यात आले.

सासवड येथून सोहळा सुरू झाल्यापासून कोर्‍हाळे मुक्काम उरकल्यानंतर सर्जा आजारी पडला. तरीही त्याने बारामतीपर्यंत पालखीरथ ओढला. मात्र, बारामतीत गेल्यावर तो जास्तच आजारी पडला. पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून उपचार करून घेतले. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. बारामती या ठिकाणीच त्याने आपले प्राण सोडले. गेल्या 10 वर्षांपासून संत सोपानकाकांचा पालखीरथ ओढत विठ्ठलाच्या दर्शनाची सर्जाची ओढ अपूर्णच राहिली. सर्जाने पालखी सोहळ्याला निम्म्यापर्यंतच साथ दिल्याने पालखी सोहळा थांबू नये, यासाठी मानकरी केंजळे कुटुंबीयांनी नवीन बैल खरेदी करीत तो पालखी सोहळ्यात देत सोहळा पुढे सुरू ठेवला आहे. वारकर्‍यांनीही या सर्जाचे अचानक निधन झाल्याने दु:ख व्यक्त केले आहे.

Back to top button