केंद्रीय यंत्रणांच्या वापराने विरोधकांचा आवाज दबणार नाही : शरद पवार | पुढारी

केंद्रीय यंत्रणांच्या वापराने विरोधकांचा आवाज दबणार नाही : शरद पवार

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांपूर्वी कोणाला माहीत नसलेली ‘ईडी’ आता घराघरांत माहीत झाली आहे. वेगळ्या विचारांचे सरकार केंद्रात आल्यानंतर ‘ईडी’, ‘सीबीआय’, ‘एनसीबी’ यासारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही, याचे भान केंद्र सरकारने ठेवावे, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या राज्यव्यापी परिवार संवाद यात्रेचा समारोप येथील तपोवन मैदानावर झाला. यावेळी झालेल्या विराट संकल्प सभेत ते बोलत होते.

पवार म्हणाले, सत्ता मिळाल्यानंतर पाय जमिनीवर ठेवायचे असतात. सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नसते. समाजाच्या कल्याणाचा विचार करायचा असतो. शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा विचार करायचा असतो; पण गेल्या काही दिवसांत एक वेगळा विचार रुजविला जात आहे. 2014 पर्यंत डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते, त्याकाळात देशात एक विचाराने निर्णय घेतले जात होते.

सत्तेचा गैरवापर नको

देश एकसंध कसा राहील, सामान्य माणसाचे प्रश्न कसे सुटतील, ही जबाबदारी सत्ताप्रमुखाची असते. 2014 साली भाजपच्या हाती सत्ता आली आणि वेगळे चित्र दिसू लागले. सत्ता येते आणि सत्ता जाते; पण सत्तेचा गैरवापर करायचा नसतो. राष्ट्रवादी काँग्रेस असो अथवा अन्य विरोधी पक्ष असोत, केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यशस्वी होतो, अशी जर त्यांना खात्री वाटत असेल, तर ते मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत, असेच म्हणावे लागेल, असे ते म्हणाले.

सांप्रदायिक विचार खड्यासारखे बाजूला करा

सत्ता कशी वापरायची नसते, हे सत्ताधारी पक्षाकडून मिळणार्‍या वागणुकीवरून दिसते. यामुळे लोकशाही मानणार्‍या सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सांप्रदायिक विचार पेरत आहेत. त्यांचे हे विचार खड्यासारखे बाजूला केले पाहिजेत. देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासह सर्वसामान्य माणूस सुखावलेला दिसला पाहिजे. याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे. त्याला तुम्हा सर्वांची साथ हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

दिल्ली ही देशाची राजधानी आहे. तिथे केजरीवालांचे सरकार आहे. मात्र, त्यांचे गृह खाते अमित शहा यांच्याकडे आहे. ही दिल्ली एकसंध राहण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. मात्र, ते घेत नाहीत. तिथे जाळपोळ सुरू आहे. हिंसाचार सुरू आहे. दिल्लीचा संदेश संपूर्ण जगभर जातो. यांना दिल्ली सांभाळता येत नाही आणि देशात सर्वकाही ठीक नाही, असा संदेश जात असल्याची टीकाही पवार यांनी केली. अशीच परिस्थिती ज्या-ज्या राज्यांत भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी असल्याचे त्यांनी सांगतिले.

संकुचित विचार

ज्यांच्याकडे देशाची सत्ता असते त्यांनी देशातील सर्व प्रांतांचा विचार करायचा असतो. यापूर्वीही देशात अन्य देशांचे नेते येत होते. ते कधी मुंबई, बंगळूर, हैदराबाद, कोलकाता अशा शहरांत जात होते. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले. ते गुजरातला गेले, चीनचे राष्ट्राध्यक्ष आले तेही गुजरातला गेले. दोन दिवसांपूर्वी इंग्लंडचे पंतप्रधान आले तेही गुजरातला गेले. ते गुजरातला गेले याबद्दल आपल्या मनात यतःकिंचितही वेगळी भावना नाही; मात्र इतका संकुचित विचार यापूर्वी देशात कधी दिसला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

आज अनेक संघर्ष करावे लागत आहेत. अनेक नवीन आव्हाने आहेत; मात्र कोल्हापूरच्या जनतेला अंतःकरणापासून अभिवादन करतो. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत कोल्हापूरच्या राष्ट्रप्रेमी जनतेने चुकीच्या प्रचाराला योग्य धडा शिकविण्याचे काम केले. निवडणुकीत मत मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, विद्वेष वाढेल अशा एका ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटातील अत्याचार दाखवून संघर्ष वाढवायचा आणि त्यातून मताचा जोगवा मागायचा, हा हेतू होता. जेव्हा ही घटना घडली तेव्हा देशात भाजपच्याच पाठिंब्यावर व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. गृहमंत्री आणि त्यावेळी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीही त्यांच्याच पाठिंब्यावर होते. जे घडले त्याचा गैरप्रचार करून माणसामाणसांत भेद वाढविण्याचे काम त्यांनी केले. मात्र, ते कोल्हापूरच्या जनतेने मान्य केले नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या जनतेने राज्यातच नव्हे, तर देशात एक वेगळा संदेश दिला आहे, असे ते म्हणाले.

मोठ्या कर्जदार शेतकर्‍यांना दोन लाखांपर्यंत माफी : अजित पवार

राज्यातील दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकर्‍यांनी त्यांच्या कर्जावरील बाकीची रक्कम भरल्यास त्यांना दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकर्‍यांची कर्जमाफी करू, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु, नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांचे काय? अशी विचारणा होत होती. त्यांच्यासाठी 50 हजारांचे अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यातून 20 लाख शेतकर्‍यांना 10 हजार कोटी रुपयांचा लाभ दिला; पण दुर्दैवाने आम्हाला अंमलबजावणी करता आली नाही, ही खंत होती. यासंदर्भात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बैठक घेऊन अनुदानाची रक्कम लवकरच वर्ग करण्यात येईल.

35 हजार शेतकर्‍यांची एक हजार रुपयांची कर्जमाफी करून शेतकर्‍यांच्या सात-बारावरून भूविकास बँकेचे नाव काढले. अधिकारी-कर्मचार्‍यांचे 275 कोटींचे दुखणे दूर केले. यंदाच्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला. गोरगरीब जनतेला आणि अठरा पगड जातीच्या लोकांना उभे करण्यासाठी वेगवेगळ्या महामंडळाच्या माध्यमातून मदत करू.

राजर्षी शाहूंचे विचार आपण प्रामाणिकपणे पुढे नेत आहोत. परंतू अलिकडच्या काळात काही शक्ती राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. जाती-धर्मावरून द्वेषाचे विष पेरण्याचे काम करत आहेत. कारण नसताना दोन समाजात तेढ निर्माण करून आपल्याला पुढे जाता येणार नाही. यातून रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांची शिकवण लक्षात ठेवूनच आपल्याला पुढे जावे लागेल. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती, गॅस दरवाढ, महागाई यावरील लोकांच लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या घटना घडविल्या जात आहेत. गॅसवरील एक हजार कोटींचा कर राज्य सरकारने काढून टाकला. तरी केंद्र सरकारच्या धोरणामुळेच प्रचंड गॅस दरवाढ होत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.

संपूर्ण ऊस कारखान्याला गेल्याशिवाय त्या-त्या भागातील साखर कारखाने बंद करू देणार नाही. त्यांना ट्रान्सपोर्ट सबसिडी, रिकव्हरीसाठी लॉस आदीसाठी मदत केली जाईल. हार्वेस्टरलाही सबसिडी देऊ. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. दोन वर्षे कोरोनाचे संकट देशावर व महाराष्ट्रावर आले. राज्यातील आर्थिक चक्रे बिघडली. अनेकांची नोकरी-रोजगार गेला. दुकाने-उद्योगधंदे-कारखाने डबघाईला गेली. महाविकास आघाडी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांना सावरण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही ते म्हणाले.

माथी भडकवण्याचे काम : जयंत पाटील

कार्यकर्त्यांची माथी भडवकण्याचे काम जातीयवादी पक्षाकडून सुरु आहे. वाढत्या महागाईवर ते काही बोलत नाहीत. 2014 साली 60 रूपये लिटर असणारे पेट्रोल आता 125 रूपये लिटर झाले. बांधकाम साहीत्य महाग होत चालले आहे, पण केंद्र सरकारचे यावर कोणतेच नियंत्रण नाही. त्यामुळे कार्यकर्‍त्यांनी जनतेशी समरस होवून अन्याय विरोधात वाचा फोडण्याचे काम करावे असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

महागाईचा दर 14 टक्केवर : भुजबळ

यावेळी अन्न व नगरी संरक्षण मंत्री छगन भुजबळ म्हणाले, काँग्रेस आघाडीच्या काळात चार टक्?के होता. आता केंद्रात सत्ता बदलली आणि महागाईचा दर 14 टक्केवर गेला आहे हा या सरकराचा विकास आहे. महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्राची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

तरुणांना ऊर्जा : पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, कोविड काळात महाविकास आघाडी सरकारने सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. खा. पवार यांनी नक्षलवादी भाग असलेल्या गडचिरोली जिल्हयासाठी विशेष कृती योजना राबविली त्यामुळे या भागाचा विकास झाला आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी, मराठवाडा विद्यापीठ नामांतर, लातूरचा भूकंप आदी प्रश्न खा. पवार यांनी केले. त्यामुळेच राजकारणात येणार्‍या तरुणांना नवीन ऊर्जा मिळत आहे.

घाणरेडे राजकारण : खडसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणाले, म्हणाले, महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले घाणेरडे राजकारण 40 वर्षात कधीच पाहिले नाही. बजरंगबली, भोंगेच्या नावाखाली पेट्रोल, डिझेल, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव, महागाई, बेरोजगारी यापासून लक्ष विचलित केले जात आहे. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याची वेळ आली आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन भाजप नीच प्रवृत्तीने वागून प्रतिस्पर्धांना नामशेष करीत आहे. मात्र, यामुळे सरकारला धक्का पोहचणार नाही.

कोल्हापूरने राजर्षी शाहूंचा विचार जपावा : मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, यंदा राजर्षी शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे. कोल्हापूर नगरीने राजर्षी शाहूंचा विचार जपला असल्याचे कृतीतून दाखवून दिले आहे. 2024 मध्ये राष्ट्रवादीला एक नंबरचा पक्ष बनविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. महापुरुषांचे विचार सोडून हनुमान चालिसा, भोंगे यांच्या माध्यमातून धर्मात अडकविले जात आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र बनविण्याचा संकल्प करावा. कोल्हापूरचे नागरिक काय करतील याचा नेम नाही. हिमालयातील बर्फ दाखविला असे सांगत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

याप्रसंगी खा. अमोल कोल्हे, आ. अमोल मिटकरी, आ. जयवंत गायकवाड, राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्याध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रवीकांत वरपे यांची भाषणे झाली.

यावेळी मंत्री राजेश टोपे, मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री दत्ताय भरणे, राज्यमंत्री आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे, विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. सुनिल तकटकरे, फौजिया खान, आ. निलेश लंके, रोहित पवार, राजेश पाटील, सुमन पाटील, अरूण लाड, यशवंत माने, आण्णासाहेब डांगे, शशिकांत शिंदे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, माजी आ. के.पी.पाटील, राजू आवळे, शिवाजीराव नाईक, संध्यादेवी कुपेकर, उदयोगपती व्ही.बी.पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, आदी उपस्थित होते.

उतावळा नवरा अन् गुडघ्याला बाशिंग

सत्तेसाठी आसुसलेली भाजप सत्ता मिळत नसल्याने वेगवेगळे उपद्रव, आरोप-प्रत्यारोप करीत आहे. ईडी, सीबीआयच्या धाडी घालणे व फोन टॅपिंगच्या माध्यमातून बदनामी सुरु आहे. सत्ता सुंदरी मिळत नसल्याने काहींची ’उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’ अशी अवस्था झाली आहे. अशी टीका खडसे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केली.

Back to top button