पुणे : पुढारी वृत्तसेवा
शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) राज्य परीक्षा परिषदेचा अध्यक्ष तुकाराम सुपे याने इतरांशी संगनमत करून निकाल लागल्यानंतर अनेकांना बनावट प्रमाणपत्रे देऊन त्यांना पास केल्याचा प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे.
सायबर पोलिसांना आतापर्यंत 2019-20 ची 400 बनावट प्रमाणपत्रे आढळून आली आहेत, तर 2018 च्या परीक्षेमध्ये पास झाल्याचे दाखवून 250 बनावट प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. याबाबत पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले, 'टीईटी परीक्षेत आरोपींनी परीक्षेचा निकाल लावल्यानंतर अनेक अपात्र परीक्षार्थींना बनावट प्रमाणपत्रे दिली आहेत. शिक्षण विभागाने सर्वांकडून ही प्रमाणपत्रे मागविली आहेत. आतापर्यंतच्या तपासणीत 2019 – 20 मध्ये सुमारे 400 आणि 2018 मध्ये सुमारे 250 जणांना बनावट प्रमाणपत्रे दिल्याचे आतापर्यंत आढळून आले आहे. ही संख्या अजून वाढू शकते.'
टीईटी परीक्षेत तुकाराम सुपे, डॉ. प्रीतीश देशमुख, अश्विनकुमार यांनी एजंटांना हाताशी धरून हजारो अपात्र परीक्षार्थींकडून कोट्यवधी रुपये घेऊन त्यांना पात्र करून घेतले. मूळ निकालात त्यांची नावे घुसविली. एवढेच नाही तर निकाल लावल्यानंतर तुकाराम सुपेकडे आलेल्या यादीतील परीक्षार्थींना पात्र ठरवून त्यांना बनावट प्रमाणपत्रे देण्याचे आदेश दिले; तसेच अनेकांना त्यांनी बनावट प्रमाणपत्रांची फोटो कॉपी काढून पोस्टांनी पाठवून दिल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासात परीक्षा परिषदेकडे बोगस प्रमाणपत्राबाबत 45 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच 203 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचा पुरावा मिळाला आहे. तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर व एजंटांकडून 81 बनावट प्रमाणपत्रे जप्त करण्यात आली आहे. जी. ए. सॉफ्टवेअर जप्त डिजिटल पुराव्याची पडताळणी सुरू आहे.