

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेतील गोधंळ सरायचे नावच घेत नाही. प्रत्येक पेपरला काही ना काही गोंधळ निर्माण होतच आहे. विशेष म्हणजे एम.ए. उर्दूच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना चक्क हस्तलिखित आणि उत्तराच्या खुणा असलेली प्रश्नपत्रिका दिली आहे.
एम.ए. उर्दू विषय विद्यापीठ अधिविभागातील भाषा संकुलात आहे. यासाठी वीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते. विद्यापीठात प्रशिक्षित मनुष्यबळ असताना हस्तलिखित प्रश्नपत्रिका काढली जात आहे. एम. एस्सी. गणिताच्या प्रश्नपत्रिके प्रमाणे एम. ए. उर्दूच्या प्रश्नपत्रिकाही हस्तलिखितच आहेत.
विद्यापीठाची परीक्षा सुरू झाल्यापासून हा गोधंळ सुरू झाला आहे. पहिले प्रश्नपत्रिका एक आणि विषय वेगळाच देण्यात आला. त्यानंतर एक तास प्रश्न पत्रिका उशीराने देण्यात आली. आता चक्क उर्दू विषयाच्या खुणांसह प्रश्नपत्रिका देण्यात आली आहे. एम. ए. उर्दू प्रश्नपत्रिकेत पर्यायाबरोबर उत्तराच्या खाली खुणा असल्याने विद्यार्थ्यांमधून आश्चर्य व्यक्त केले जात होते.
या गोंधळामुळे उर्दू परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उर्दू परीक्षेचा पेपर सेट करण्यात आलेल्या शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे व विद्यापीठाच्या निष्काळजीपणामुळे उर्दू परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावे लागणार असल्याची शक्यता परीक्षा विभागाकडून वर्तविली जात आहे.
विद्यापीठ कॅम्पसमध्येच अशी स्थिती
विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येच जर असा प्रकार घडत असेल तर इतर महाविद्यालयीन परीक्षा केंद्रावर परीक्षेसंबधी किती गांभीर्याने नियोजन करण्यात आले आहे. याबाबतीत शिक्षण क्षेत्रातील मंडळीकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
नेमका गोंधळ काय झाला हे उर्दू शब्दांमुळे कळाले नाहीत. संबधित शिक्षकांवर विद्यापीठाच्या समितीकडून योग्य ती कारवाई केली जाईल.
– डॉ. शिवकुमार गणपूर,
संचालक व मूल्यमापन विभाग