

सोलापूर , प्रतिनिधी : दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. अकरावीसाठी जिल्ह्याभरात सर्व महाविद्यालयांत एकूण 74 हजार 580 जागा आहेत. शास्त्र शाखेच्या प्रवेशाकरिता मुलांचा ओढा असून, वाणिज्य व कला शाखेत प्रवेशाअभावी जागा शिल्लक राहण्याची शक्यता आहे.
जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाकडून अकरावी प्रवेश प्रक्रियेकरिता नियोजन करण्यात येत आहे. शुक्रवार, 24 जूनपासून प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने महाविद्यालय स्तरावरच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यात तब्बल 63 हजार 193 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश देण्याची क्षमता शिक्षण विभागाकडे आहे.
मात्र, शास्त्र शाखेच्या प्रवेशाकरिताच पालक व विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्याने शास्त्र शाखेच्या प्रवेशाकरिता स्पर्धा होणार असल्याचे स्पष्ट होत आहेे.
सोलापूर जिल्ह्याभरात शास्त्र शाखेच्या प्रवेशाकरिता एकूण 32 हजार जागा आहेत. वाणिज्य शाखेच्या प्रवेशाकरिता 23 हजार 500 जागा आहेत. कला शाखेच्या प्रवेशाकरिता 17 हजार जागा आहेत. याशिवाय टेक्निकल शाखेकरिता 2 हजार 80 प्रवेश क्षमता आहे.
अकरावी प्रवेशाकरिता जरी प्रवेश क्षमता असली तरी ठराविक महाविद्यालय व ठराविक शाखेच्या प्रवेशाकरिताच विद्यार्थ्यांचा कल असल्याने प्रवेशाकरिता चुरस निर्माण होणार आहे. सोलापूर शहरातील दयानंद, संगमेश्वर, हरिभाई, वालचंद, सोनी आदींसारख्या नामांकित महाविद्यालयांतच शास्त्र व वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी पालक व मुलांचा कल दिसून येत आहे.
यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षात 18 जुलैपासून कॉलेजचे वर्ग सुुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. 24 जूनपासून 25 दिवस प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात प्रवेशाकरिता तीन वेळा गुणवत्ता यादी कॉलेज स्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गुणवत्तेनुसारच कॉलेज स्तरावर प्रवेश देण्यात येणार आहे. ठराविक कॉलेजमध्ये पाल्यास प्रवेश मिळावा, यासाठी पालक आतापासूनच कॉलेज स्तरावर फिल्डिंग लावत असल्याचेही चित्र दिसून येत आहे.