सोलापूर : जलसंपदामंत्री जयंत पाटलांच्या स्वागताचे फलक अनगरच्या युवकांनी फाडले | पुढारी

सोलापूर : जलसंपदामंत्री जयंत पाटलांच्या स्वागताचे फलक अनगरच्या युवकांनी फाडले

मोहोळ ; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यानिमित्त जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्या समर्थकांनी लावलेले डिजिटल फलक अनगरच्या चार युवकांनी फाडून नुकसान केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी २२ फेब्रुवारी सोमनाथ हरी वाघमारे व त्याचे अन्य तीन साथीदार (सर्व रा. अनगर ता. मोहोळ) यांच्या विरोधात मोहोळ पोलिसात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. २१ फेब्रुवारी रोजी मोहोळ येथे आढावा बैठक असल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते व जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांच्या समर्थकांनी अनगर पाटी ते मोहोळ शहराच्या दरम्यान स्वागताचे डिजिटल फलक लावले होते.

Koo App

या डिजिटल फलकावर पक्षाध्यक्ष शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उमेश पाटील या सर्वांचे फोटो होते.

अनगर येथील सोमनाथ हरी वाघमारे व त्याचे अन्य तीन साथीदारांनी २१ फेब्रुवारी रोजी अनगर पाटी ते मोहोळ शहराच्या दरम्यान लावलेले डिजिटल फलक फाडून नुकसान केले.

याप्रकरणी फुलचंद सरवदे यांनी मोहोळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार वरील संशयितांच्या विरोधात २२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार लोंढे हे करीत आहेत. या घटनेमुळे मोहोळ तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Back to top button