

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्य मंडळातर्फे दहावीच्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी सुधार करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीचा प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांना 7 ते 16 जून यादरम्यान नियमित शुल्कासह, तर 17 ते 21 जून यादरम्यान विलंब शुल्कासह त्यांच्या माध्यमिक शाळांमार्फत भरता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी 7 ते 21 जून या कालावधीत अर्ज भरत असतानाच 8 ते 22 जून या कालावधीत शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना चलनाद्वारे बँकेत शुल्क भरता येणार आहे, तर 23 जूनला माध्यमिक शाळांमार्फत बँकेत शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या विभागीय मंडळात जमा करायच्या आहेत. ऑनलाइन अर्जात मार्च-एप्रिल 2023 मध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची त्या परीक्षेतील माहिती प्रवेश अर्जात घेता येईल. श्रेणीसुधार करू इच्छिणार्या विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्ट 2023 आणि फेब्रुवारी-मार्च 2024 या लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.