
राज्यातील काही मतदार संघांचा अपवाद वगळता सर्वत्र उमेदवार जाहीर झाले असून, त्यामध्ये सर्वच पक्षांनी घराणेशाहीला बळ दिले आहे. विशेषतः काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका करणार्या भाजपने राज्यात घराणेशाहीला सर्वाधिक पसंती दिली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत अकोल्यातून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे. धोत्रे यांना तब्येतीच्या कारणास्तव उमेदवारी नाकारण्यात आली असली, तरी त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मुलालाच पसंती देण्यात आली आहे.
अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या पत्नी विद्यमान खासदार आहेत. त्यांना भाजपमध्ये प्रवेश देत लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. अहमदनगरमध्येही विद्यमान खासदार राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र खा. सुजय विखे-पाटील यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. राज्याचे माजी मंत्री ए. टी. पवार यांची सून असलेल्या डॉ. भारती पवार या 2019 च्या निवडणुकीत भाजपकडून लोकसभेवर निवडून गेल्या. त्यांना भाजपने दुसर्यांदा दिंडोरीतून उमेदवारी दिली आहे. राज्यातील आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हिना गावित यांना भाजपने तिसर्यांदा संधी दिली आहे, तर बीडमधून विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट केला असला, तरी त्यांच्या भगिनी आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. रावेरमधून माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनाच तिकीट दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेही काही मतदार संघांत घराणेशाहीला बळ दिले आहे. कल्याणमधून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपले पुत्र श्रीकांत शिंदे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. हातकणंगले मतदार संघातून माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांना दुसर्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळ-वाशिम मतदार संघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांना डावलून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आतापर्यंत चार उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापैकी तीन उमेदवार हे राजकीय घराण्यातील आहेत. बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नणंद खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत. पवार घराण्यातील नणंद-भावजयमधील ही लढत राज्यात सर्वात लक्षवेधी ठरली आहे.
धाराशिवमधून माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांची सून आणि राणा जगजितसिंह पाटील यांची पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे. त्या आपले दीर शिवसेना उ.बा.ठा. गटाचे उमेदवार खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी लढत देणार आहेत, तर रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांची कन्या आदिती तटकरे या राज्यात मंत्री, तर पुत्र अनिकेत विधान परिषद सदस्य आहेत. शिवसेना उ.बा.ठा. गटाने मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे.